मुंबई : पवई तलाव स्वच्छतेसाठी महापालिका दिवसरात्र काम करीत असून कोटयवधी रूपये खर्च करीत आहेत. तलावात दररोज 18 दशलक्ष लिटर प्रक्रिया न केलेले सांडपाणी भरत असल्याचे महापालिकेनेच मान्य केले आहे. त्यामुळे हा तलाव प्रदूषणमुक्त होण्यासाठी येथे विसर्जनावर बंदी घालावी अशी आग्रही मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
अॅडव्हान्स्ड लोकॅलिटी मॅनेजमेंट (एएलएम) ग्रुपच्या अध्यक्षा पामेला चीमा यांनीही याबाबत खेद व्यक्त केला आहे. हार्वेस्टर वापरुन तलाव स्वच्छ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जी तलावाच्या जैवविविधतेसाठी हानिकारक असून तलावात वाढणार्या जलपर्णी स्वच्छ करण्यात प्रशासन अपरे पडत असल्याचे चीमा यांनी सांगितले.
गणेशोत्सवाला एक महिना उरला असल्याने नॅटकनेक्टने पोलिस आणि महानगरपालिका आयुक्तांना ईमेल पाठवून याबाबत मार्गदर्शक तत्त्वे आत्ताच तयार करावीत अशीही विनंती केली आहे. पवई तलावातील घाणेरड्या पाण्यात मूर्तींचे विसर्जन करावे लागते, याचे आम्हाला खूप वाईट वाटते, असे एएलएमचे सदस्य आणि हिरानंदानी गार्डन्सचे रहिवासी मिलन भट यांनी सांगितले तर मोठ्या मूर्ती तलावात विसर्जीत करू नयेत, असे पवईतील रहिवासी गीतांजली धुळेकर यांनी सांगितले.
नॅटकनेक्ट फाउंडेशनने पीएमओच्या संकेतस्थळावर याबाबत तक्रार दाखल केली होती. याला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने (एमओईएफसीसी) प्रतिसाद देत महाराष्ट्र पर्यावरण संचालकांना आवश्यक कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत.बी.एम.कुमार, संचालक, नॅट कनेक्ट