महामुंबईत बुधवारीच झाली गटारी pudhari photo
मुंबई

Gatari Amavasya : महामुंबईत बुधवारीच झाली गटारी

मुंबईत गटारीच्या पहिल्याच दिवशी दुकानांबाहेर रांगा : भावही कडाडले

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : खवय्यांनी हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव मारुन बुधवारी ‘गटारी’ अमावस्येचा आनंद लुटला. मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी मुंबई, ठाण्यातील बाजारात खवय्यांची सकाळपासूनच गर्दी झाली होती. विशेष म्हणजे दिवसभर पाऊस कोसळत असल्यामुळे खवय्यांच्या आनंदाला जणू उधाणच आले होते.

आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी दीप अमावस्या असते. दीप अमावस्येला बोली भाषेत गटारी अमावस्या असे म्हटले जाते. यंदा आषाढ महिन्याची सांगता गुरुवारी होणार आहे. सोमवती अमावस्येला शक्यतो खवय्ये सामिष पदार्थ निषिद्ध मानतात. त्यामुळे बुधवारी रात्री सुरू झालेली गटारी सर्वांनी साजरी केली.

मटण-मासळीच्या दुकानाबाहेर सकाळपासूनच भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, लोक पावसात भिजून मटण, मच्छी खरेदी करत होते. वाढत्या मागणीमुळे नेहमीपेक्षा दहा ते पंधरा टक्क्यांनी भाव वाढले होते. तरीही खवय्यानी हात आखडता घेतला नाही. मटणाचे भाव तर तब्बल 900 रुपयांवर पोचले होते. ग्राहकांकडून मटणाला चांगली मागणी होती.

हॉटेल व्यावसायिक, तसेच घरगुती ग्राहकांकडून मटणाला मागणी होती, असे विक्रेत्यांनी सांगितले. मच्छी मार्केट मधली स्थिती ही तशीच होती, या ठिकाणी विशेषतः महिलांची गर्दी जास्त दिसत होती. सुरमई, पापलेट, हलवा, रावस प्रचंड चढ्या दराने विकले जात होते. चांगल्या दर्जाची सुरमई आणि पापलेट तर पंधराशे रुपयांवर जाऊन पोहोचले होते.

आज बुधवार आणि त्यात नेमका जोरदार पाऊस, त्यामुळे चिकन-मटन खरेदी करणार्‍यांची संख्या मोठी होती. वाढत्या मागणीमुळे भावही वाढले. मात्र उद्यापासून भाव खाली येतील. कारण श्रावण महिन्यामध्ये नेहमीपेक्षा जेमतेम 25 ते 30 टक्केच धंदा होतो.
प्रदीप बनसोडे, विक्रेता, खारदेव नगर चेंबूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT