मुंबई : राज्य परिवहन प्राधिकरणाने (एसटीए) राज्यभरातील ई-बाइक टॅक्सी सेवांसाठीचे किमान भाडे अधिकृतपणे मंजूर केले. ई-बाइक टॅक्सीचा पहिला टप्पा 1.5 किमीचा असेल. पहिल्या टप्प्यातील भाडे 15 रुपये निश्चित करण्यात आले असून त्यापुढील प्रतिकिमीसाठी 10.27 रुपये आकारले जातील. या भाडे निश्चितीमुळे मंगळवारपासून ई-बाइक टॅक्सी राज्यात अधिकृतपणे धावू लागेल.
राज्य सरकारने ‘महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, 2025’ अंतर्गत राज्यात सेवा देणार्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर जाहीर केले आहेत. मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 73 आणि 96 नुसार शासनाला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला असून, तो तत्काळ लागू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
परिवहन मंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठी प्रतिकिलोमीटर 10.27 रुपयेप्रमाणे प्रवासी भाडे आकारले जाणार आहे. याशिवाय पहिला टप्पा 1.5 किमीचा असून प्राथमिक भाडे 15 रुपये इतके अनिवार्य असेल.
याशिवाय राज्य परिवहन प्राधिकरणाने उबर इंडिया सिस्टीम प्रा. लि., रॅपिडो ट्रान्स्पोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि., अनी टेक्नोलॉजीस प्रा. लि. यांना 30 दिवसांकरीता ‘मुंबई महानगर क्षेत्राकरीता’ तात्पुरता परवाना देण्यास मान्यता दिली.
राज्य सरकारचा उद्देश
या निर्णयामुळे प्रवाशांना स्वस्त, सोयीस्कर व पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींच्या माध्यमातून वाहतुकीवरील ताण कमी होऊन, प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.