ड्रग्ज तस्करी 
मुंबई

Drug Trafficking Chase: ड्रग्ज तस्करीचे ‘पंजाब कनेक्शन’ पुन्हा उघड; नाशिक-चाकण थरारक पाठलागात तिघे जेरबंद

एक कोटींचा मुद्देमाल जप्त; हेरॉईन, ग्लोक पिस्टलसह अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कोपरखैरणे : नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने नाशिक ते चाकण थरारक पाठलाग करत तीन अमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत पुन्हा एकदा तस्करीचे पंजाब कनेक्शन समोर आले आहे. आतापर्यंत पंजाबमधून हेरॉईन आणणाऱ्या 40 जणांना अटक केल्याची माहिती पत्रकार परिषदेत सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांनी दिली.

बलजीत सिंग सविंदर सिंग उर्फ मोनु, गुरु प्रतापसिंग शरणजीत सिंग उर्फ गोपी व ट्रक चालक करमजीतसिंग मनिंदरसिंग अशी अटक आरोपींची नावे आहेत. ते तिघेही पंजाबचे रहिवासी आहेत.

तळोजा पोलीस स्टेशनमध्ये हेरॉईन प्रकरणी एक गुन्हा नोंद करण्यात आला होता. यातील पाहिजे आरोपी बलजीत सिंग व त्याचा साथीदार गोपी दोन्ही हे ट्रकद्वारे नवी मुंबई, मुंबई व पुणे परिसरात अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे समोर आले होते. तांत्रिक तपासात हे संशयित आरोपी मध्यप्रदेश मार्गे महाराष्ट्रात येत असल्याची माहिती मिळाली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस

निरीक्षक निलेश धुमाळ, पोलीस हवालदार तायडे, धोंडे, पालवे, चव्हाण याचे पथक नाशिक येथे दबा धरून बसल होते. संशयित ट्रक येत असल्याचे दिसताच नाशिक येथून संबंधित आरोपींच्या ट्रकचा पथकाने पाठलाग केला. पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसीत निगोजे गाव, पिंपरी चिंचवड परिसरात कारवाई करून आरोपींना ताब्यात घेत ट्रकची व संशयित आरोपींची झडती घेतली.

पिस्टलसह एक कोटी 3 लाखांचा ऐवज जप्त

या झडतीत आरोपींकडून 82.6 ग्रॅम उच्च प्रतीचे हेरॉईन त्याचे बाजार मूल्य 41 लाख 30 हजार, 1 ऑस्ट्रिया निर्मित 8 लाखांची ग्लोक पिस्टल 2 मॅगझिन, 4 जिवंत काडतुसे ज्याचे मूल्य दोन लाख 50 हजार रुपये आहे. तसेच त्यांचेकडील 4 मोबाईल व 1 वजनकाटा असा एकूण सुमारे 1 कोटी 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT