मुंबई : भारत-बांगला देश सीमेवरून गैरमार्गाने आणल्या जाणाऱ्या सोने तस्करी टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. 
मुंबई

Gold Smuggling Network | कुरिअर नेटवर्कमधून ४७५ कोटींचे सोने देशभर पोहोचवले

भारत - बांगला देश सीमेवरून तस्करी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : भारत-बांगला देश सीमेवरून पश्चिम बंगाल आणि आसाममार्गे भारतात आणलेले परदेशी बनावटीचे सोने छोट्या छोट्या कुरिअर पार्सलमधून देशभर पोहोचविणाऱ्या मोठ्या तस्करी नेटवर्कचा महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाने (डीआरआय) पर्दाफाश केला आहे. ‘ऑपरेशन बॉर्डर बुलियन बस्ट’ अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली असून त्यात कथित सूत्रधाराचाही समावेश आहे.

या टोळीने चालू वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत अंदाजे ४७५ कोटी रुपये किमतीचे सुमारे ३१८ किलो तस्करीचे सोने कुरिअर नेटवर्कच्या माध्यमातून देशातील विविध भागांत पोहोचवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.डीआरआयच्या मुंबई विभागाला भारत-बांगलादेश सीमेवरून परदेशी बनावटीच्या सोन्याची तस्करी करून ते कुरिअर नेटवर्कच्या माध्यमातून देशभर पाठविले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर २३ सप्टेंबरपासून मुंबई, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद आणि गुवाहाटी या पाच शहरांत एकाचवेळी कारवाई करण्यात आली.

गुवाहाटी, कोलकात्यातून मुंबईकडे पार्सल

तस्करीचे सोने गुवाहाटी आणि कोलकाता येथून छोट्या छोट्या कुरिअर पार्सलमध्ये भरून मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद येथील ठरावीक व्यक्तींपर्यंत पोहोचविले जात होते. ही पार्सल देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी पाठविली जात असल्याचा डीआरआयचा प्राथमिक तपास आहे. या पार्सलसाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याचेही तपासात आढळले.

माहितीच्या आधारे डीआरआयच्या पथकाने काही पार्सल मार्गातच अडविली. त्यातून ६.६१ किलो परदेशी बनावटीचे सोन्याचे बार जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत सुमारे १० कोटी ३६ लाख रुपये आहे. पार्सल स्वीकारण्यासाठी आलेल्या सात जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पार्सल पाठविणाऱ्या व्यक्तींच्या कोलकाता येथील ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले. या कारवाईत आणखी तिघांना अटक करण्यात आली.

मुंबईतून सूत्रधाराला पकडले

तपासाचा पुढील टप्पा मुंबईपर्यंत पोहोचल्यानंतर या संपूर्ण नेटवर्कच्या पार्सलची पाठवणी आणि वितरणाचे समन्वय साधणाऱ्या कथित सूत्रधाराला मुंबईत अटक करण्यात आली. तस्करीचे सोने सीमेवरून देशात आल्यानंतर ते कोणाकडे पाठवायचे, कोणत्या मार्गाने कुरिअर करायचे आणि अंतिम प्राप्तकर्त्यांपर्यंत कसे पोहोचवायचे, याचा तपास डीआरआयकडून केला जात आहे.

नऊ महिन्यांत ३१८ किलो सोने

डीआरआयने जप्त केलेल्या कागदपत्रांची प्राथमिक छाननी केली असता या नेटवर्कची व्याप्ती मोठी असल्याचे समोर आले. २०२६ च्या पहिल्या नऊ महिन्यांत अंदाजे ४७५ कोटी रुपये किमतीचे सुमारे ३१८ किलो तस्करीचे सोने याच कुरिअर नेटवर्कद्वारे विविध ठिकाणी पोहोचविण्यात आल्याचा संशय आहे. या सोन्याची देशांतर्गत बाजारात विल्हेवाट लावली जात होती का, तसेच त्यातून मिळणारा पैसा कोणाकडे जात होता, याचाही तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT