Mumbai | मुंबईतही ठाकरे गटाला गळती? Pudhari
मुंबई

Mumbai | मुंबईतही ठाकरे गटाला गळती?

नगरसेविका सरिता म्हस्के शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिन्हावर जिंकून आलेले चार नगरसेवक शिंदे सेनेच्या वळचणीला गेले असतानाच आता या फुटीची लागण मुंबईतही लागली आहे. चांदिवली येथील प्रभाग 157 मधून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. तर म्हस्के या शिंदे सेनेसोबत गेल्या तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या 64 वर येईल. दरम्यान, ठाकरे सेनेच्या गटनेतेपदी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनेमध्ये चढाओढ सुरू आहे. त्यासाठी ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक आपल्या गळाला लावण्यासाठी शिंदे सेनेने ‘ऑपरेशन टायगर’ सुरू केले आहे. त्यांच्या या ऑपरेशनमध्ये कल्याण-डोंबिवलीमधील चार नगरसेवकांना आपल्या जाळ्यात ओढण्यात शिंदे गटाला यश आले. चार नगरसेवक फुटल्याने ठाकरे सेना अस्वस्थ असतानाच आता मुंबईतही फुटीचे पडसाद उमटल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. महापालिकेत पक्षाची गट नोंदणी करण्यासाठी शिवसेना नेते, आमदार अनिल परब यांच्या उपस्थितीत शिवसेना भवन येथे बुधवारी ठाकरे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला 65 नगरसेवकांपैकी 64 नगरसेवक उपस्थित होते.

या बैठकीला डॉ.सरिता म्हस्के गैरहजर राहिल्या. त्यानंतर गटनोंदणी करण्यासाठी ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक नवी मुंबईला रवाना झाले, त्यावेळीही म्हस्के गैरहजर राहिल्याने त्यांच्या फुटीबाबत संशय बळावला आहे. प्रभाग 157 मधून सरिता म्हस्के या मशाल चिन्हावर लढत भाजपच्या आशा तायडे यांचा पराभव करून जिंकून आल्या आहेत.

डॉ. मस्के संपर्कात आहेत : अ‍ॅड. परब

म्हस्के या कुठेही गेलेल्या नाहीत, त्या बैठकीला नसल्या तरी आमच्या पक्षातील नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्या थेट नवी मुंबईत येतील, असे पक्षाचे नेते अ‍ॅड. अनिल परब यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सर्वांनुमते पेडणेकर यांची निवड

नगरसेवकांच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर विश्वास दाखवला आहे. बैठकीत पेडणेकर यांना शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. सर्वानुमते त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT