मुंबई

कुठलेही प्रशिक्षण न घेता लडाव मॅरेथॉन केली पूर्ण; डॉ. रेखा लखानी यांची गरूडझेप

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही. प्रबळ आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमचे लक्ष्य साध्य करू शकता. हे सानपाडा येथील दंतचिकित्सक डॉ. रेखा प्रेमकुमार लखानी यांनी दाखवून दिले आहे. कुठलेही व्यावसायिक प्रशिक्षण न घेता भारतातील सर्वांत कठीण मॅरेथॉनपैकी एक असलेली लडाख मॅरेथॉन त्यांनी पूर्ण केली.

यंदाची लडाख मॅरेथॉन ७ ते १० सप्टेंबर २०२३ या कालावधीत झाली. या मॅरेथॉनमध्ये संपूर्ण जगभरातून ४६९ धावपटू सहभागी होते. त्यात केवळ ५१ महिला होत्या. लडाख मॅरेथॉन ही ११.१५५ फूट ते १७,६१८ फूट उंचीवर आयोजित केली जाते. त्यामुळे अनुभवी प्रोफेशनल रनर यात प्रामुख्याने भाग घेतात. मात्र, प्रथमच सहभाग घेत मरेथॉन पूर्ण करणाऱ्या डॉ. लखानी याला अपवाद ठरल्या.

मी हौशी धावपटू आहे. मॅरथॉनसाठी आवश्यक कुठलेही व्यावसायिक ट्रेनिंग मी घेतलेले नाही. तरीही, २०२२ आणि २०२३ मध्ये दोन हाफ मॅरेथॉन (२१ किमी) तीन तासांमध्ये पूर्ण केल्या. समुद्रसपाटीपासून ११ ते १८ हजार हजार फूट उंचीवर धावताना तुमचा कस लागतो. लडाखसारख्या ठिकाणी कमी ऑक्सिजन पातळीवर सलग ६ तास धावण्यासाठी तग धरण्याची क्षमता, निर्माण करण्यासाठी योग्य शारीरिक प्रशिक्षण आवश्यक आहे, हे मला ठाउक होते. त्यासाठी मी प्रशिक्षक मनोज आणि मिनार यांच्या नेतृत्वाखाली सानपाडा येथील क्रॉसफिट मायडेनमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. याशिवाय याच परिसरात राहणाच्या शीतल मल्होत्रा यांच्या दिशा योगामध्ये जाताना योगाचे धडे घेतले, असे डॉ. लखानी म्हणाल्या.

डॉ. लखानी यांनी सांगितले की, मॅरेथॉनसाठी एनडीएस मेमोरियल स्टेडियममध्ये सकाळी ५.३० वाजता पोहोचलो. ६ वाजता रेसला सुरुवात झाली. पदक आणि मॅरेथॉन पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ही मॅरेथान तास ४५ मिनिटांमध्ये पूर्ण करावी लागते. सकाळचे तापमान ६-८ सेल्सिअसच्या आसपास होते. अंतिम रेषेपर्यंत पोहोचण्यावेळी २०-२२ सेल्सिअसच्या आसपास होते. बोचऱ्या या थंडीमुळे अर्ध्या तासाच्या फरकाने ओठ कोरडे होते. त्यामुळे सोबत लहान लिप बाम ठेवला. ६.३५ च्या सुमारास सूर्योदय झाला तरी
थंड वारा भावण्यात अडथळा ठरतो.

मी सुरुवातीला चांगल्या वेगासह धावत होते. पण कडक उन्हामुळे माझा वेग आणि उर्जाही कमी होत गेली. शेवटचे ४ किलोमीटर अंतर शिल्लक असताना आता धावणे शक्य नाही, असे वाटले. मात्र, जिद्द सोडली नाही. अंतिम रेषा आवाक्यात आल्यावर वेग वाढवला. त्यातच चिअर करून मला प्रोत्साहन देणाऱ्या पतीला पाहून माझा आत्मविश्वास उंचावला. ६ तास ३० मिनिटांत मॅरेथॉन पूर्ण करताना मी पदकासह पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देखील जिंकले, असे डॉ. लखानी म्हणाल्या.

लडाखमध्ये धावणार असाल तर…

  • प्रतिकूल वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी लेह लडाखमध्ये आठवडाभर आधी पोहोचा
  •  हवामानाशी जुळवून घेण्यासाठी सुरुवातीचे दोन दिवस पूर्णपणे विश्रांती घ्या
  •  कमी ऑक्सिजन पातळी असल्यामुळे योग्य पद्धतीने श्वास घेण्याचे तंत्र खूप महत्त्वाचे
  • ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी ४-५ कापूर आणि तितक्याच लवंगांचा समावेश असलेली हातरूमालाची पोटली सोबत ठेवा.
  • बाहेरचे अन्न (जंक फूड) कमी करा. साखरेचे सेवन कमी करा
  •  हिरवे पूर्ण मूग, सोयाबीन, शेंगदाणे यांसारखे शाकाहारी प्रोटीन खोत वाढवा
  • व्यायामापूर्वी ऊर्जा मिळावी म्हणून ३० मिनिटे आधी चणे, सुकामेवा, अधे रताळे खा
  •  वर्कआऊट नंतर रोज नारळाच्या पाण्यात ३ लिंबू पिळून त्यात चिमूटभर हिमालयीन गुलाबी मीठ घालून प्या.
  •  धावणे किंवा व्यायाम करताना इलेक्ट्रोलाइट सोबत असो, नसो. दररोज भरपूर पाणी प्या
  • तीव्र पर्वतीय आजाराची लक्षणे कमी करण्यासाठी डायमॉक्स नावाची टॅब्लेट सोबत ठेवा.
  • प्रौढांसाठी न्याहारी आणि रात्रीच्या जेवणानंतर दिवसातून दोन वेळा आणि लडाखला पोहोचल्यानंतरही तेच डोस आणखी दोन दिवस घ्यावे आणि नंतर थांबवावे.
SCROLL FOR NEXT