मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात सरकारला कायदेशीर सल्ला देण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीची राज्य सरकारने पुनर्रचना केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी खा. धैर्यशील माने; तर दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांची तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन आदेश गुरुवारी जारी करण्यात आला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित आहे. याबाबत राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देण्यासाठी प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तीनजणांची तज्ज्ञ समिती नेमण्याचा निर्णय 12 फेब्रुवारी 2003 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला होता. त्यानंतर वेळोवेळी या समितीची पुनर्रचना करण्यात आली होती. प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीची पुनर्रचना करण्यात आली होती.
30 जून 2022 रोजी महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा समितीची पुनर्रचना करण्यात आली होती. राज्य सरकारने समितीतील काही जागा रिक्त झाल्याने समितीची फेररचना केली आहे. समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने, तर सहअध्यक्षपदी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमध्ये तज्ज्ञ सदस्य म्हणून डॉ. प्रतापसिंह जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याखेरीज सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी दिनेश ओऊळकर, अॅड. र. वि. पाटील, अॅड. महेश बिर्जे यांचीही सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण मध्यवर्ती समितीच्या अध्यक्षांना समितीचे सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव व वरिष्ठ विधी सल्लागार हे विशेष निमंत्रित असतील. तसेच, सीमा प्रश्नावर नेमलेले सचिव, प्रधान सचिव किंवा अपर मुख्य सचिव हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.