मुंबई : देशातील शोषित, पीडितांचे अश्रू पुसणारे उद्धारकर्ता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी असलेल्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी चार दिवस आधीच चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. खेड्यापाड्यांतून मिळेल त्या वाहनाने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आंबेडकरी अनुयायी प्रत्येक वर्षी दाखल होतात. यंदाच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनीसुध्दा भीमसैनिक चैत्यभूमीवर आले आहेत.
१ डिसेंबरपासूनच महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या खेड्यांपाड्यांतून आलेले भीमसैनिक डोक्यावर कपड्यांचे बोचके घेऊन चैत्यभूमी गाठत आहेत. यंदा चैत्यभूमीवर महिला, पुरूष, विद्यार्थी, वयोवृध्द आणि लहान मुलांसह अंध-अपंगही मोठ्या संख्येने दिसून येत आहेत.
डॉ. आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर मुंबईतील दादर या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी पार्क येथील अरबी समुद्रालगत असलेल्या जागेवर त्यांचे स्मृतीस्थळ बनविण्यात आले. या स्थळाला चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते. याच चैत्यभूमीवर नतमस्तक होण्यासाठी, आपल्या उध्दारकर्त्याला नमन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी दरवर्षी मोठ्या संख्येने येतात.
कुणाच्याही भरवश्यावर न बसता शिवाजी पार्कच्या एका कडेला चुली पेटवून काही आंबेडकरी अनुयायी जेवण बनविताना दिसून आले. आपल्या पोटाची सोय होईल तेव्हा होईल, परंतु सध्या चूल पेटवून आपली भूक भागविणे सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर असलेली श्रध्दा ही भाकरीपेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. यामुळे कडाक्याच्या थंडीतही उघड्यावर आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीवर आपल्या उध्दारकर्त्याला अभिवादन करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.
आम्ही १५ जण कानपूर, उत्तर प्रदेश येथून ३ डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर दाखल झालो. गेल्या ७ वर्षांपासून आम्ही सर्वजण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतो. सध्या पार्कमध्ये वास्तव्याला आहोत.- विजयलक्ष्मी गौतम, आंबेडकर अनुयायी, उत्तर प्रदेश
गेल्या ५ वर्षांपासून मी कुटुंबियांसह नागपूर येथून चैत्यभूमीवर येत आहे. यंदा आम्ही ३ डिसेंबर रोजी सकाळी आलो आहोत. ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेऊन ट्रेनने पुन्हा गावी जाऊ.अमित कुमबलवार, नागपूर