Diwali Faral Price list 2025 Mumbai
मुंबई : दिवाळीचा उत्सव अवघ्या आठ दिवसांत सुरू होणार आहे. पूर्वी या दिवसांत घराघरांतून फराळाचा सुगंध दरवळू लागायचा. पण सध्या नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असणाऱ्या महिलांना इच्छा असूनही दिवाळीचा फराळ बनवायला वेळ मिळत नाही. त्यामुळे सध्या रेडिमेड फराळाला वाढती मागणी आहे. गेल्या काही वर्षांत तयार फराळाची वाढती मागणी पाहता केटरिंग, बचत गट, काही घरगुती महिलांनी महिनाभरापासून फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी कंबर कसली आहे. आजही करंजी, चकली, शंकरपाळे, अनारसे, शेव या फराळाच्या पारंपारिक पदार्थांना अधिक मागणी दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत फराळाच्या किंमती जैसे थे आहेत.
दिवाळीची चाहूल लागली असून यंदा विशेषतः खाद्य-तेलाच्या डब्याच्या किमतीत गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३५० रुपयांची वाढ झाली असून, हरभरा डाळ, शेंगदाणे, साखर, डालडा आणि पिठी साखरेचे दरही वाढले आहेत. मात्र फराळ विक्रेत्यांनी यंदा किंमतीत वाढ केलेली दिसत नाही. ग्राहकांना घरगुती चव हवी असल्याने रेडिमेडपेक्षा हँडमेड फराळालाच अधिक पसंती मिळते. चिवडा, बेसन लाडू, रवा लाडू, शेव, करंजी, शंकरपाळे, चकली, अनारसे हे सारेच पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. फराळ बनविण्याच्या माध्यमातून कित्येक गोरगरीब महिलांना रोजगाराची संधी मिळाली आहे. नोकरदार, व्यावसायिक महिलांबरोबरच सध्या गृहिणी देखील रेडिमेड फराळाची आर्डर घेणे पसंत करत आहेत जिभेचे चोचले आहेत. जिभेचे चोचले पुरविणाऱ्यांसाठी फराळामध्ये काही नावीन्यता असलेले पहायल मिळतात. यामध्ये पालक शेव, टोमॅटो/शेजवान चकली, तिखट शंकरपाळे, मसाला चिवडा यालाही मागणी आहे. डाएट फराळही काही ठिकाणी बनविला जात असून तळण्याऐवजी भाजले किंवा उकडले जात आहे. तेल, तुपाचा कमी वापर केला जात आहे.
ऑनलाइन ऑर्डर्स सुरू
ऑनलाइन ऑर्डरमुळे व्यवसाय वाढला, पण दर्जा टिकवणं गरजेचं आहे. गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाइन ऑर्डर सुरू आहेतच. गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात असल्याने ग्राहक चव घेण्यासाठीही येत नाहीत. फक्त ऑर्डर देतात आहेत. येत्या मंगळवारपासून ऑर्डर पूर्ण करणे सुरू होईल, तसेच ऑन दि स्पॉट खरेदी करणारेही ग्राहक मोठ्या प्रमाणात असल्याचे दादर रानडे रोड येथील दिलीप आचरेकर यांनी सांगितले.
फराळाची परदेशवारी
मुंबईत तयार होणारा फराळ आता अमेरिका, दुबई, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, जर्मनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जातो. पण हा फराळ कुटुंबीयांकडून घेऊन पाठविला जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून परदेशी जाणाऱ्या ऑर्डर देणे सुरू असल्याचे दादर येथील कल्पना नाईक यांनी सांगितले.
गिफ्ट पॅकमध्ये फराळ
आमच्याकडे ग्राहकांकडून गिफ्ट्स पॅकची मागणी असल्याने १ किलो व अर्धा किलोच्या पॅकमध्ये फराळ उपलब्ध आहे. करंजी, भाजणीच्या चकली, शेवला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे रोशनी सुर्वे यांनी सांगितले.
गृहिणींकडेही मोठ्या ऑर्डर्स
दादर, मुलुंड, ठाणे, बोरीवली, मिरा रोड या भागांतील पारंपारिक फराळ बनवणाऱ्या केटरर्ससह घरगुती महिलांकडे ऑर्डर मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक ठिकाणी महिलांचे गट एकत्र येऊन हाताने बनवलेला घरगुती फराळ तयार करून ऑनलाइन विक्री करत आहेत. करंजी आणि चकलीची सर्वाधिक ऑर्डर येते, असे अभिजीत चव्हाण या बोरीवलीतील फराळ व्यावसायिकांनी सांगितले.
फराळाचे सर्वसाधारण दर (किलोमध्ये)
करंजी ६०० रु.
रवा लाडू ६०० रु.
बेसन लाडू ६५० रु.
मुंग डाळ लाडू ६५० रु.
हिरवा मुंग लाडू ६५० रु.
नाचणी लाडू ६५० रु.
ड्रायफ्रूट खजूर लाडू ११०० रु.
शंकरपाळी ५०० रु.
चिवडा ५०० रु.
भाजणी चकली ६०० रु.
अनारसे ६५० रु.