नवी मुंबई: आधुनिक नवी मुंबईच्या झगमगाटातही आपल्या पूर्वजांनी जपलेली संस्कृती, परंपरा आणि गावपणाची ओळख अभिमानाने जतन करणारा दिवाळे कोळीवाडा आजही श्री बहिरीनाथाच्या आगळ्यावेगळ्या पालखी सोहळ्यामुळे ओळखला जातो. नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवाळे कोळीवाड्यात बहिरीनाथाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.
दिवाळीतील अश्विन शुद्ध अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. याच दिवशी नवी मुंबईच्या दिवाळे कोळीवाड्यात बहिरीनाथाची पालखी मिरवणूक निघते.
रविवारीही देवाचे गावात आगमन झाल्यावर ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक कोळी नृत्यासह भव्य काढली जाणार असून तीन दिवसांचा हा उत्सव बलिप्रतिपदेपर्यंत चालेल. दिवाळी पाडव्याला भावपूर्ण निरोप देत बहिरीनाथाची मूर्ती समुद्रात विसर्जित केली जाईल.
वर्षभर समुद्रात विराजमान बहिरीनाथाला दिवाळीत गावात आणले जाते. नरक चतुर्दशीला ग्रामस्थ सुमारे ३५ ते ४० होड्यांमधून घारापुरी बेटाजवळील समुद्रात जातात. पूर्वी ‘गण तांडेल’ म्हणून ओळखले जाणारे घराणे ‘तांडेल’ म्हणून रूढ झाले.
या घराण्याची वंशपरंपरा कै. बेमटयां गण तांडेल, कै. बाळा बेमटयां गण तांडेल, कै. नागा आणि जोमा बाळा गण तांडेल, कै. शनिवार, नामदेव व कृष्णा नागा तांडेल, कै. नारायण जोमा तांडेल आणि सध्या ही परंपरा जपणारे तांडेल कुटुंबीय अशा सहा पिढ्यांमध्ये पुढे आली आहे.
समुद्राच्या कुशीतून बहिरीनाथाचे आगमन
समुद्रात मूर्ती सापडल्यानंतर तिला विधिवत स्नान घालून शेंदूरलेपन केले जाते आणि होडीत विराजमान करून वाजतगाजत दिवाळे कोळीवाड्यातील देवघरात आणले जाते. बहिरीनाथाच्या आगमनाने संपूर्ण दिवाळे कोळीवाडा भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघतो.
पाडव्याच्या दिवशी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागते. नवी मुंबई, मुंबई, पनवेल, उरण, ठाणे आणि कल्याण परिसरातून भाविक नवसपूर्तीसाठी तसेच नवस बोलण्यासाठी येतात. दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारास बहिरीनाथाला पालखीतून वाजतगाजत मिरवणुकीने बंदरात आणले जाते. तेथे देवाला होडीत विराजमान करून भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जातो.