‘तेरे मेरे सपने’मुळे मुंबईतील घटस्फोट घटणार ? (Pudhari File Photo)
मुंबई

Divorce Counseling Mumbai | ‘तेरे मेरे सपने’मुळे मुंबईतील घटस्फोट घटणार ?

विलेपार्लेत मुंबई महापालिकेचे विवाहपूर्व समुपदेशन केंद्र सुरू

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील नागरिकांना वैवाहिक जीवनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, तसेच जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने मुंबई महापालिकेने विवाहपूर्व समुपदेशन केंद्र सुरु केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भारतीय स्त्री शक्ती या संस्थेच्या माध्यमातून विलेपार्ले येथे ‘तेरे मेरे सपने’ या नावाने विवाहपूर्व समुपदेशन केंद्र सुरू झाले आहे.

या समुपदेशन केंद्रात जोडप्यांना विवाहपूर्व संवाद कौशल्य, ताणतणाव व्यवस्थापन, नातेसंबंधातील समन्वय यासारख्या बाबींसाठी मार्गदर्शन मिळणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शहरी उपजीविका केंद्र अंतर्गत या विवाहपूर्व संवाद केंद्राचा शुभारंभ विलेपार्ले येथील बाबासाहेब गावडे रुग्णालयाच्या इमारतीत करण्यात आला आहे.

विवाहपूर्व समुपदेशन-आजची गरज या विषयावर परिसंवादाचे आयोजनही या निमित्ताने करण्यात आले होते. या कार्यक्रमातील वक्त्या, कौटुंबिक न्यायालयाच्या निवृत्त प्रमुख सल्लागार डॉ. सुवर्णा भुजबळ यांनी विवाहपूर्व समुपदेशनाचे महत्त्व अधोरेखित केले.

सुदृढ संवाद, भावनिक समतोल आणि परस्परांचा आदर हे वैवाहिक आयुष्य टिकवणारे खरे आधारस्तंभ आहेत. यासाठी विवाहपूर्व समुपदेशन अत्यंत गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. या परिसंवादासाठी कौटुंबिक न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती डॉ. सुनंदा जोशी यांचीही विशेष उपस्थिती होती. परस्परांविषयी प्रेम, विश्वास आणि आदर ही सुदृढ नात्यांची मूलभूत तत्वे आहेत, असे मत डॉ. सुनंदा जोशी यांनी परिसंवादादरम्यान मांडले.

यावेळी भारतीय स्त्री शक्ती संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा वर्षा पवार, संस्थेच्या मुंबई अध्यक्षा डॉ. प्राची मोघे, स्त्री शक्ती संस्थेच्या मनीषा चव्हाण हे मान्यवर देखील उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रणिती मशानकर यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT