Dismissed police sub-inspector Ranjit Kasle arrested
मुंबई : पुढारी वृतसेवा
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला संपविण्यासाठी सुपारी मिळाल्याचा दावा करून खळबळ उडवून देणारा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेला दिल्लीतून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
जातीय द्वेष पसरविणे, सार्वजनिक अधिकार्यांची बदनामी करणे आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर शेअर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. बीड जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक असलेल्या रणजीत कासले याने वाल्मिक कराडला संपविण्यासाठी आपल्याला सुपारी मिळाल्याचा दावा केला होता.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर अपलोड करून त्याने पोलीस दलाची बदनामी केली होती. दरम्यान, त्याने एका राजकीय नेत्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. शुक्रवारी रणजीत कासले याला दिल्लीतून अटक केली.