Disha Salian Death Case Pudhari
मुंबई

Disha Salian Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सुनावणी पूर्ण; मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला, काय घडलं?

Disha Salian Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील सुनावणी पूर्ण झाली असून, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

Rahul Shelke

Disha Salian Death Case: गेल्या सहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पूर्ण झाली असून, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. न्यायाधीश कोतवाल यांनी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवत लवकरच निर्णय दिला जाईल, असे संकेत दिले आहेत.

सुनावणीदरम्यान दिशा सालियन यांच्या मृत्यूनंतर झालेल्या दुखापती, चेहऱ्यावरील जखमा आणि पोस्टमॉर्टेम अहवालातील निष्कर्षांवर न्यायालयात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. १२व्या मजल्यावरून पडल्याचा दावा असताना चेहऱ्याचा अत्यंत नाजूक भाग फ्रॅक्चर न होता केवळ दात फ्रॅक्चर कसे झाले, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.

यावर सरकारी वकील शिशिर हिरे यांनी पोस्टमॉर्टेम अहवालाचा संदर्भ देत दिशा सालियन समोरच्या बाजूने पडल्या होत्या आणि जमिनीवर आदळताना पहिला आघात दातांवर झाल्याने ते फ्रॅक्चर झाले, असा युक्तिवाद केला. मात्र, इतक्या मोठ्या उंचीवरून पडल्याने झालेल्या तीव्र आघातात चेहऱ्याचा नाजूक भाग फ्रॅक्चर का झाला नाही, असा प्रश्न न्यायालयाने पुन्हा उपस्थित केला.

दरम्यान, तपास पुन्हा सुरू झाल्यानंतर १५ जानेवारी २०२४ रोजी दिशा सालियन यांच्या वडिलांचा जबाब नोंदवण्यात आल्याचे सरकारी वकील हिरे यांनी न्यायालयाला सांगितले. एका व्यवहाराशी संबंधित कराराची प्रक्रिया रद्द झाल्यानंतर दिशा सालियन नैराश्यात गेल्या होत्या आणि त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या वडिलांनी जबाबात म्हटल्याचा दावा सरकारी पक्षाने केला.

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, दिशा सालियन यांच्या वडिलांनी आपल्या जबाबात, “आमची आदित्य ठाकरे यांच्याशी कधीही भेट झालेली नाही आणि मी पूर्ण शुद्धीत हा जबाब देत आहे,” असे म्हटले आहे. दिशा सालियन यांच्या आई-वडिलांनी दंडाधिकाऱ्यांसमोरही जबाब नोंदवला असून, त्यात कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितल्याचा युक्तिवादही सरकारी पक्षाने केला.

सुनावणीदरम्यान दिशा सालियन यांच्यासोबत राहणारे रोहन राय यांच्या जबाबाचाही सरकारी वकील हिरे यांनी संदर्भ दिला. दिशा सालियन यांच्या हिताची आणि त्यांच्या कल्याणाची सर्वाधिक चिंता असलेल्या व्यक्तींमध्ये रोहन राय यांचे स्थान महत्त्वाचे असल्याचे सरकारी पक्षाने नमूद केले. तपासादरम्यान सर्वप्रथम रोहन राय यांचा जबाब नोंदवण्यात आल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले.

सरकारी वकिलांच्या युक्तिवादानुसार, लॉकडाऊनच्या काळात रोहन राय दिशा सालियन यांच्यासोबत राहत होते. त्यांच्या जबाबात दिशा आणि त्यांच्या वडिलांमध्ये वाद झाला होता तसेच घटनेपूर्वी तीन महिन्यांपासून दोघांमध्ये संवाद नव्हता, असे नमूद करण्यात आले होते. रोहन राय यांनी कोणत्याही घातपाताची शक्यता नाकारली असून, दिशा सालियन या तीव्र तणावाखाली असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटल्याचा दावा सरकारी पक्षाने केला.

“सहा वर्षांनंतर या प्रकरणाचे राजकीय भांडवल करता येणार नाही,” असा युक्तिवादही सरकारी वकील शिशिर हिरे यांनी न्यायालयात केला. व्यक्तींमध्ये मतभेद असू शकतात, मात्र प्रत्येक मतभेदातून गुन्हेगारी स्वरूपाचा प्रकार सिद्ध होत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

या प्रकरणात तक्रारी किंवा हरकती असल्यास पुढे येण्यासाठी जाहिरातही देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कोणतीही व्यक्ती तक्रार घेऊन पुढे आली नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

दिशा सालियन यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे कोणतेही पुरावे वैद्यकीय अहवालात आढळले नसल्याचा दावा सरकारी पक्षाने केला. या प्रकरणात डॉक्टरांचा सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत जबाब नोंदवण्यात आल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले. दिशा सालियन यांचे पोस्टमॉर्टेम करणारे डॉ. जाधव यांच्या जबाबाचा संदर्भ देत, लैंगिक अत्याचाराचे कोणतेही पुरावे नसल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले.

तपासादरम्यान पोलिसांनी अत्यंत काळजीपूर्वक कारवाई केल्याचा दावाही सरकारी वकील हिरे यांनी केला. मात्र, सरकारी पक्षाकडून तपासातील विविध बाबींचा सविस्तर उल्लेख सुरू असताना न्यायालयाने, “इतक्या खोलात जाण्याची गरज नाही. तुम्ही मांडत असलेल्या मुद्द्याला येथे वाव नाही,” असे निरीक्षण नोंदवल्याचे सांगण्यात आले.

यानंतर न्यायालयाने सीआरपीसीच्या कलम १७४ अंतर्गत करण्यात आलेल्या चौकशीबाबतही प्रश्न उपस्थित केले. या चौकशीची प्रक्रिया आणि तिच्याशी संबंधित मुद्द्यांवर सुनावणीदरम्यान चर्चा झाली.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश कोतवाल यांनी प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून चर्चेत आणि राजकीय वर्तुळातही गाजत असलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT