Disha Salian Case Pudhari
मुंबई

Disha Salian Death Case: सहा वर्षांनंतर दिशाच्या मृत्यूचा पुन्हा तपास का, 2020 ची 'ती' घटना नेमकी काय?

Disha Salian CBI FIR: CBI आता दिशाच्या मृत्यूचा नव्याने तपास करणार आहे.

पुढारी डिजिटल टीम

Who Is Disha Salian Death Case Marathi News

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यूला सहा वर्षे उलटल्यानंतर सीबीआयने अखेर FIR दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपास सुरू केला आहे. दिशाच्या वडिलांनी आरोपींमध्ये ज्या नावांचा उल्लेख केलाय त्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला. या प्रकरणात नेमके काय घडले होते? यापूर्वीच्या तपासात काय समोर आले? उच्च न्यायालयाने कोणते प्रश्न उपस्थित केले? आणि आता CBI कोणत्या बाबींचा तपास करणार आहे? 2020 मध्ये माध्यमांमध्ये या घटनेचं वार्तांकन कसं झालं होतं? जाणून घेऊया...

दिशा सालियन कोण होती?

दिशा सालियन ही सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर म्हणून काम करत होती. वरुण शर्मा आणि अभिनेता सुशांतसिंह राजपूत या कलाकारांची ती व्यवस्थापक होती. बंटी सजदेह यांच्या कॉर्नरस्टोन स्पोर्ट अँड एंटरटेनमेंट लिमिटेडशीही ती संबंधित होती. सजदेह हे रोहित शर्माच्या पत्नीचे भाऊ आहेत. दिशाने पब्लिश रिलेशन या क्षेत्रातून करिअरला सुरूवात केली होती. नंतर ती बॉलिवूडमध्ये स्थिरावली होती.

जून 2020 मध्ये काय घडले?

8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील निवासी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडून दिशा सालियनचा मृत्यू झाला.

Mid Day च्या 11 जून 2020 च्या वृत्तानुसार, दिशा तिचा प्रियकर रोहन रॉयच्या घरी पार्टीसाठी गेली होती. त्यावेळी घरी आणखी चार जण होते. यात एक महिला देखील होती. ही चारही नावे बॉलिवूड किंवा राजकारणाशी थेट संबंधित नव्हती.

पार्टीत सर्वांनी मद्यपान केले होते, घरात गाणीही सुरू होती. पोलिसांनी घरात उपस्थित असलेल्या सर्वांचा जबाब घेतला होता. पार्टी दरम्यान दिशा बेडरुममध्ये गेली होती. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता दिशा बेडरुममध्ये नव्हती. काही वेळाने इमारतीतील सुरक्षा रक्षकाने दिशा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे कळवल्याचे जबाबातून समोर आले होते. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येपूर्वीचे हे वृत्त होते.

Disha Salian Case

बॉलिवूडच्या दोन डिल

दिशाला बॉलिवूडमधील दोन डिल मिळाल्या नव्हत्या आणि यामुळे ती निराश होती, असे मुंबई पोलिसांनी सांगितले होते. 18 सप्टेंबर 2020 रोजी टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर याबाबतचे वृत्त होते. दिशाने मृत्यूपूर्वी पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल केला होता, अशी चर्चा होती. ही चर्चा फेटाळून लावताना पोलिसांनी दिशाने परदेशात राहणाऱ्या मैत्रिणीला कॉल केला होता, असे स्पष्ट केले होते. या मैत्रिणीने दिलेल्या जबाबात दिशा दोन डिलवरुन नाराज होती, असे उघड झाल्याचे वृत्तात म्हटले होते.

दिशाचा सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येशी काय संबंध?

दिशा सालियन प्रकरणात पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, प्राथमिक चौकशीनंतर तिने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मुंबई पोलिसांनी काढला होता. तिच्या मृत्यूच्या अवघ्या सहा दिवसांनी, 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली होती. दिशा ही सुशांतची मॅनेजर असल्याने या दोघांचा मृत्यूचा संबंध जोडला गेला.

यापूर्वीच्या तपासात काय निष्पन्न झाले?

यापूर्वीच्या पोलीस तपासानुसार दिशाच्या मृत्यूमागे हत्या किंवा अन्य कोणताही गैरप्रकार झाल्याचे पुरावे आढळले नव्हते. दिशाच्या वडिलांनीही मुलीच्या मृत्यूबद्दल चुकीचे वृत्त पसरवू नका, असे आवाहन केले होते.

2023 मध्ये राज्य सरकारने विशेष तपास पथक म्हणजेच SIT ची नियुक्तीही केली होती. या पथकानेही दिशाच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले होते.

मात्र, आता दिशांच्या वडिलांनी या प्रकरणाच्या नव्याने तपासाची मागणी केली. 'माझ्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केली आणि काही प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय दबावातून हे प्रकरण दाबले गेले’, असा आरोप दिशाचे वडील सतीश सालियन यांनी केला होता.

मुंबई उच्च न्यायालयाने CBI तपासाचे आदेश का दिले?

मुंबई उच्च न्यायालयाने 2 सप्टेंबर रोजी या प्रकरणातील तपासाबाबत काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली होती. तपासात काही महत्त्वाच्या बाबींमध्ये विसंगती असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. शवविच्छेदन अहवालात नोंदवण्यात आलेल्या दुखापतींकडेही उच्च न्यायालयाने लक्ष वेधले. या दुखापतींबाबत तज्ज्ञांचे मत आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.

तोपर्यंत आरोपीसारखे वागवता येणार नाही

तपासादरम्यान ठोस व पुरेसे पुरावे गोळा होईपर्यंत कुणालाही या प्रकरणात आरोपी म्हणून वागवले जाणार नाही. तपासाअंती गुन्हा घडल्याचे निष्पन्‍न न झाल्‍यास सीबीआयने संबंधित न्यायालयात योग्य तो ‘समरी रिपोर्ट’ सादर करावा, असे निर्देश‍ही मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.

आता CBI काय तपासणार?

उच्च न्यायालयाच्या निरीक्षणानंतर CBI ने रविवारी गुन्हा दाखल केला आहे. CBI आता दिशाच्या मृत्यूचा नव्याने तपास करणार आहे. यात खालील मुद्द्यांचा प्रामुख्याने समावेश अशेल.

  • यापूर्वीच्या तपासात जमा करण्यात आलेले पुरावे

  • शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या दुखापती

  • मृत्यूच्या वेळी नेमकी परिस्थिती काय होती

  • दिशाच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप

दिशाच्या वडिलांनी तपास यंत्रणेला काय सांगितले?

11 सप्टेंबर रोजी CBI ने दिशांचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवला.

दिशाच्या मृत्यूशी संबंधित आपल्याला माहिती असलेल्या बाबी तपास यंत्रणेला सांगितल्याचे त्यांनी म्हटले. तसेच काही व्यक्तींची चौकशी करण्याची मागणी करत त्यांची नावेही तपास यंत्रणेला दिल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरेंंच्या तत्कालीन अंगरक्षकाचे नावे तपास यंत्रणेला दिल्याचे सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT