मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियनची सामूहिक बलात्कार करून निघृण हत्या केल्याचा आरोप करत एनआयएमार्फत चौकशीचे आदेश द्या अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पांचोली, दिनो मोरीयो यांच्यासह मुंबई पोलिसांवर या याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच सुशांतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात ४४ वेळा फोनवर काय बोलणे झाले? तसेच सुशांत आणि दिशाच्या मृत्यूवर सवाल उठवणाऱ्या सर्व साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
दिशा सालियनचा मृत्यू ८ जून २०२० रोजी एका १४ मजल्याच्या इमारतीवरून पडल्याने झाला होता. सीबीआय अधिकाऱ्यांनी ही आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढला. यावेळी मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकला. त्यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी याचिकेतून केला आहे.
या प्रकरणाची चौकशी एनआयएमार्फत समीर वानखेडेंसारख्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली नव्याने करण्यात यावी, तसेच जून २०२० रोजीचे दिशा, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचे मोबाईल लोकेशन तपासले जावे, कारण त्या रात्री हे सगळे १०० मीटरच्या परिसरात एकत्रच होते. त्याचबरोबर १३ व १४ जून २०२० रोजीचे सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत, अशी मागणी दिशाच्या वडिलांनी या याचिकेतून केली आहे.