मुंबई

‘हातकणंगले’सह लोकसभेच्या तीन जागा द्या; ‘वंचित’ची मागणी

दिनेश चोरगे

मुंबई : वंचित बहुजन आघाडीला राज्यातील महाविकास आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात दिल्लीत चर्चेच्या फेर्‍या झाल्याचे वृत्त आहे. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या हातकणंगले, अकोला आणि अमरावती या तीन जागांची मागणी केली आहे. काँग्रेसने अकोला लोकसभेची जागा सोडण्याची तयारी दर्शवली असल्याचे कळतेे.

प्रकाश आंबेडकर हे कोणासोबत जाणार, याची चर्चा राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबरोबरच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची आतापर्यंत चर्चा झाली आहे. मात्र, आता त्यांनी काँग्रेसशी गांभीर्याने चर्चा सुरू केली आहे. त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी दिल्लीत आघाडीबाबत चर्चा केली आहे. या चर्चेत त्यांनी अकोला, अमरावती आणि हातकणंगले अशा तीन जागांची मागणी केली आहे. परंतु, यात अकोला ही लोकसभेची जागा प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोडण्यास खर्गे राजी झाले आहेत.

वंचित बहुजन आघाडीसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे असतील. त्यामुळे हातकणंगले लोकसभेची जागा त्यांनी मागितली आहे. सध्या तरी एक जागा देण्याचे आश्वासन खर्गे यांनी त्यांना दिले आहे. भाजपला निवडणुकीत मदत करतो, हा ठपका त्यांना पुसून काढायचा आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. रामदास आठवले यांच्यासह अन्य दलित नेते हे भाजपच्या ओसरीला आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची वंचित महाविकास आघाडीत आली, तर त्याचा फायदा काँग्रेसला होईल, असे काँग्रेसच्या नेतृत्वाला वाटत आहे.

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना याआधीच महाआघाडीत आणण्यासाठी चर्चा केलेली आहे. दोघेही आघाडीबाबत राजी झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी प्रकाश आंबेडकर यांचे मतभेद होते. परंतु, अलीकडेच या दोन नेत्यांची भेट झाली आणि समेट झाला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत घेण्यास पवार यांची परवानगी आहे.

SCROLL FOR NEXT