पुढारी; ऑनलाईन डेस्क : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या (Disaster Management Authority) नियमात मोठा बदल करण्यात आला. आज (दि.११) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (State Cabinet Meeting) यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री तर उपाध्यक्ष दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, असा मोठा बदल करण्यात आला आहे. २०१९ च्या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये मुख्यमंत्री आणि काही ठराविक मंत्री असतील, असा नियम होता. त्यामध्ये बदल करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्थान देतानाच उपमुख्यमंत्री शिंदे यांना वगळण्यात आले आहे. यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील नव्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय ६ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला. या समितीत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मदत व पुनवर्सन मंत्री मकरंद जाधव-पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर या मंत्र्यांना सदस्यपदी नेमण्यात आले आहे. मात्र, एकनाथ शिंदे हे राज्याचे नगरविकास व गृहनिर्माण मंत्री असूनही त्यांना आपत्ती व्यवस्थापन समितीमधून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.