मुंबई : वरळी बीडीडी चाळीतील पोलीस वसाहतीमधील पोलीस कुटुंबीय सध्या दूषीत पाण्यामुळे त्रस्त आहेत. कधी काळेकुट्ट तर कधी गढूळ पाणी येत आहे. याबाबत अनेक तक्रारी करूनही म्हाडासह मुंबई महानगरपालिकेने दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांना बंद बाटलीतील मिनरल पाणी प्यावे लागत आहे.
वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास सुरू आहे. या पुनर्विकासामधील 62 ते 74 म्हणजेच 12 चाळी पोलिसांची वसाहत आहे. या वसाहतीला कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे गेल्या काही दिवसापासून येथील रहिवासी पाणीटंचाईने त्रस्त आहेत. आता 15 ते 20 दिवसांपासून नळाला दूषित पाणी येत असल्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कधी काळेकुट्ट तर कधी गढूळ पाणी येत आहे. हे पाणी पिणे सोडा, या पाण्याचा कपडे धुणे व आंघोळीसाठीही वापर करता नसल्याची व्यथा रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
अधिवेशनात आमदार सुनील शिंदे यांनी या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले. दूषित पाणी पिऊन पोलीस आजारी पडले तर त्याला जबाबदार कोण असा सवाल यावेळी शिंदे यांनी केला. यामुळे सरकारी यंत्रणेसह टाटा कंस्ट्रक्शन कंपनी खडबडून जागी झाली असून त्यांनी दुरुस्ती सुरू केली आहे.
कमी व दूषित पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरिकांना टँकर मागवावे लागत आहेत. तर पिण्यासाठी बंद बाटलीतील पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे पाण्याचा खर्च वाढला आहे. साधारणता एका कुटुंबाला दररोज 100 ते 200 रुपये खर्च करावे लागत आहेत.