पवन होन्याळकर
मुंबई : अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी आता पारंपरिक मार्गाऐवजी थेट दुसर्या वर्षात प्रवेश घेण्याचा ‘शॉर्टकट’ मार्ग लोकप्रिय होत आहे. अकरावी-बारावीचे दोन वर्षांचे शिक्षण आणि त्यानंतर सीईटी परीक्षेचा ताण टाळण्यासाठी हजारो विद्यार्थी दहावीनंतर पॉलिटेक्निक पदविका पूर्ण करून थेट पदवीच्या दुसर्या वर्षाला प्रवेश घेत आहेत. गेल्या तीन वर्षांत हा कल झपाट्याने वाढला आहे. दरम्यान, 2025-26 साठी फार्मसी-अभियांत्रिकीला प्रवेश घेणार्यांचे 72,230 अर्ज आले.
सीईटी सेलकडील आकडेवारीनुसार, 2024-25 या शैक्षणिक वर्षात तब्बल 54,710 विद्यार्थ्यांनी थेट दुसर्या वर्षात प्रवेश घेतला होता. यामध्ये अभियांत्रिकीचे 41,894, तर फार्मसीचे 12,816 विद्यार्थी होते. ही वाढ मागील वर्षाच्या तुलनेत अभियांत्रिकीमध्ये 21% तर फार्मसीमध्ये तब्बल 47% इतकी मोठी होती. यंदाही अर्ज प्रक्रियेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
ताणमुक्त शिक्षण : अकरावी-बारावीचा अभ्यास आणि एमएचटी-सीईटीसारख्या स्पर्धात्मक परीक्षेचा प्रचंड ताण टाळता येतो.
भक्कम पाया : पॉलिटेक्निकच्या तीन वर्षांत अभियांत्रिकी किंवा फार्मसीचा तांत्रिक पाया मजबूत होतो, ज्यामुळे पदवीचे शिक्षण सोपे जाते.
नोकरीची हमी : पदविकेनंतर नोकरीचा एक पर्याय उपलब्ध असतोच, शिवाय पदवी पूर्ण केल्यावर करिअरच्या अधिक चांगल्या संधी मिळतात.
निश्चित प्रवेश : पदविका पूर्ण झाल्यावर थेट दुसर्या वर्षात प्रवेशाचा मार्ग मोकळा होतो, ज्यामुळे प्रवेशाची अनिश्चितता टाळता येते.
अभियांत्रिकी : पॉलिटेक्निक डिप्लोमा, मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एस्सी. पदवी (बारावीत गणित विषय आवश्यक) किंवा संबंधित शाखेत तीन वर्षांचा डी.व्होक. अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी थेट दुसर्या वर्षी प्रवेशासाठी पात्र ठरतात.
फार्मसी : फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त संस्थेतून डी.फार्म. (डिप्लोमा इन फार्मसी) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पदवीच्या दुसर्या वर्षासाठी पात्र असतात.
राखीव जागा ः तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नियमांनुसार, प्रथम वर्षाच्या एकूण जागांपैकी 10% जागा थेट द्वितीय वर्षासाठी राखीव असतात. याशिवाय, पहिल्या वर्षात प्रवेश सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांच्या रिक्त जागाही उपलब्ध होत असल्याने प्रवेशाच्या संधी वाढतात.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात (2025-26) थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीच्या 52,014 जागांसाठी तब्बल 58,220 अर्ज आले आहेत, ज्यात 36,436 मुले आणि 21,784 मुली आहेत. पहिल्याच फेरीत 11 हजार विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. फार्मसीमध्येही 18,985 जागांसाठी 14,010 अर्ज दाखल झाले असून, प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.