राज्याचे माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.  
मुंबई

राज्य निवडणूक आयुक्तपदी दिनेश वाघमारे यांची नियुक्ती

Dinesh Waghmare : राज्यपालांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर स्विकारला पदभार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्याचे माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी (दि.२८) राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचे स्वागत केले.

यू.पी.एस. मदान यांचा ४ सप्टेंबर २०२४ रोजी कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. राज्यपाल राधाकृष्णन यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी वर्णी लागली. यासंदर्भातील अधिसूचना २० जानेवारीला प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार त्यांनी आज राज्याचे सातवे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.

वाघमारे यांनी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीमध्ये बीटेक (१९८७) केले आहे. आयआयटी खरगपूरमधून त्यांनी संगणकशास्रात एमटेक (१९८९); तर यूकेमधून ‘विकास व प्रकल्प नियोजन’ या विषयात एमएस्सी (२००७) केले आहे. १९९४ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेले वाघमारे यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे.

रत्नागिरीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून दिनेश वाघमारे यांच्या प्रशासकीय कारकीर्दीला सुरुवात झाली होती. वाशीम आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारीपद भूषविले होते. ते नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्षही होते. विविध शासकीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, सदस्य सचिव, तसेच नवी मुंबई व पिंपरी-चिंचवड महानरपालिकेचे आयुक्त म्हणूनही ते कार्यरत होते. अमरावतीचे विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. वैद्यकीय शिक्षण विभागासह सामाजिक न्याय, ऊर्जा, गृह इत्यादी विभागातही त्यांनी विविध पदे भूषविली आहेत.

वाघमारे यांना स्कॉच अवॉर्ड, नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड, सीएसआर इंडिया २०२१ अवॉर्ड, पीएसयू अवॉर्ड फॉर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, ग्रीनटेक लीडिंग डायरेक्टर अवॉर्ड २०२१, सत्यन मित्रा नॅशनल अवॉर्ड इत्यादी पुरस्कारांनी वेळोवेळी गौरविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT