Dindoshi Court-Chitranagari Flyover  pudhari news network
मुंबई

Dindoshi Court-Chitranagari Flyover : दिंडोशी न्यायालय-चित्रनगरी उड्डाणपूल 16 मेपर्यंत खुला

उड्डाणपुलाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरु

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरु आहे. एकूण ३१ खांबांपैकी २७ खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. यात रत्नागिरी जंक्शन येथे ४ खांब उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. यानंतर खांबांवर तुळई स्थापित करणे, डेक स्लॅब ओतकाम, उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचे पोहोच मार्ग व अनुषंगिक कामे करून १६ मे २०२६ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला होईल.

हा जोड मार्ग प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. टप्पा ३ (अ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरी बांधकामाचा समावेश आहे. या प्रकल्प अंतर्गत दिंडोशी गोरेगाव दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान सहापदरी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याची लांबी १,२६५ मीटर आहे. उड्डाणपुलासाठी बॉक्स गर्डर व कॉंक्रिटचा वापर केला जात आहे. तसेच, रस्ता ओलांडण्याकरिता पादचारी पूल, स्वयंचलित सरकत्या जिन्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या उड्डाणपुलाची उभारणी दोन टप्प्यांत करण्यात येत असून त्यामध्ये गोरेगाव बाजू आणि मुलुंड बाजू असे दोन भाग आहेत. दिंडोशी न्यायालयापासून पुलास सुरुवात होते. रत्नागिरी जंक्शन हॉटेल येथे ९० अंश कोनात उड्डाणपूल वळतो. तर दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उतरतो. पुलाचे एकूण ३१ खांब असून, त्यांचे उभारणी विभागांचे स्पॅन आहेत. एकूण २६ पैकी १२ स्पॅनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित १४ स्पॅनचे काम १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत २७ खांबांची उभारणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. तर, रत्नागिरी जंक्शनच्या वळणावरील उर्वरित ४ खांब उभारणी प्रगतिपथावर असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वाहतुकीस होणार फायदा

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग हा मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता आहे. विशेषतः उत्तर मुंबईतील वाहतुकीस याचा मोठा फायदा होणार आहे. सुमारे १२.२० किलोमीटरच्या या प्रकल्पामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांदरम्यान नवीन जोडरस्ता तयार होईल आणि नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.

गोरेगाव ते मुलुंडदरम्यान प्रवासाचा कालावधी ७५ मिनिटांवरून सुमारे २५ मिनिटांपर्यंत कमी होईल. इंधन वापरात बचत होण्यासह मुंबईच्या बायू गुणवत्ता निर्देशांकातही (एक्यूआय) सुधारणा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT