धनंजय मुंडे, दिलीप वळसे -पाटील File Photo
मुंबई

NCP cabinet expansion : दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात पुन्हा स्‍थान मिळणार ?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आज पक्षाच्‍या कोअर कमिटीची महत्त्‍वपूर्ण बैठक

पुढारी वृत्तसेवा

NCP cabinet expansion : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत रविवारी झालेल्‍या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत घडामोडींना अचानक वेग आला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाची चर्चा असून, आज (दि. २) दुपारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. राज्यातली सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ उपस्‍थित होते.

राष्‍ट्रवादीच्‍या विलनीकरणाला विरोधच

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांबरोबर झालेल्‍या भेटीत राष्‍ट्रवादीच्‍या नेत्‍यांची महत्त्‍वाच्‍या विषयांवर चर्चा. यावेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलनीकरण नकोच अशी भूमिका मांडण्‍यात आली. तसेच खाते वाटपावरही चर्चा झाली.

अर्थ खात्‍यासाठी राष्‍ट्रवादी काँग्रेस आग्रही

महायुती सरकारच्या सत्तावाटपात महत्त्वाचे मानले जाणारे अर्थ खाते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच सोपवण्यात यावे, ही आग्रही मागणीही या बैठकीत करण्‍यात आल्‍याचे समजते.

मंत्रिमंडळ पुनर्रचनेची शक्यता

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे या दोन्ही अनुभवी नेत्यांना पुन्‍हा एकदा मंत्रीमंडळात स्‍थान मिळण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे. आज (दि. २ नोव्‍हेंबर) दुपारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत केंद्रीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेचा आढावा घेतला जाणार आहे. पक्षांतर्गत बदलांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पदाधिकारी निवडीनंतर पक्षांतर्गत नाराजी?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) आमदार झिशान सिद्दीकी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. यावेळी ही नियुक्ती करताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे किंवा इतर नेत्यांना विश्वासात घेण्यात आलं नव्हतं. सिद्दीकी यांना मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्‍यक्षपदाचे पत्र देताना पक्षातील इतर कोणतेही नेते नव्हते, पार्थ पवार फक्त स्वतः होते. उमेश पाटील यांची राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करताना त्यावेळीही पक्षाचे इतर नेते नव्हते. पार्थ पवार हे पक्षाचे खासदार आहेत, मात्र अजित पवार यांच्या पक्षाची धुरा सांभाळणारे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, त्याचबरोबर छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ ही दुसरी फळी म्हणून पाहिली जात होती, त्या फळीला विश्वासात घेतलं जात नाही, असं सातत्याने सांगितलं जात होतं. सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना वगळून ही भेट झालेली आहे, त्‍यामुळे अप्रत्‍यक्षपणे पक्षामधील खदखद दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासमोर सांगितल्या गेल्याची चर्चा सध्या समोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT