नवी मुंबई ः दिग्दर्शकांचे माझ्यावर उपकार आहेत, त्यांनी मला घडवलं, असे सांगत आपल्या कारकिर्दीतील प्रत्येक टप्प्यावर दिग्दर्शकांनी दिलेल्या संधी आणि मार्गदर्शनामुळेच विविध भूमिका साकारता आल्या अशी प्रांजळ कबुली ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी दिली.
नवी मुंबई चित्रपट सेना आयोजित ‘सिनेदिशा’ कार्यक्रमात चतुरस्त्र, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा सत्कार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. बुधवारी, वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना प्रभावळकर यांनी आपल्या दीर्घ अभिनय प्रवासातील आठवणी आणि अनुभव रसिकांसमोर मांडताना अभिनय प्रवासात भेटलेल्या प्रत्येक दिग्दर्शकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
बालपणापासून मिळालेल्या संस्कारांचा उल्लेख करत प्रभावळकर यांनी शिस्त, वेळेचे पालन आणि साध्या जीवनशैलीचा अभिनय क्षेत्रातील प्रवासावर मोठा प्रभाव पडल्याचे सांगितले. लहानपणी वेळेवर जेवणे, झोपणे यासारख्या गोष्टी शिकवल्या गेल्या. त्या शिस्तीमुळेच पुढे काम करताना मदत झाल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमात प्रभावळकर यांच्या कारकिर्दीचा गौरव करताना दिग्दर्शक केदार शिंदे, संजय जाधव, अभिनेते पुष्कर श्रोत्री, अभिजित पानसे, मनसे चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांसारख्या अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन माध्यमांतील प्रभावळकरांच्या बहुआयामी योगदानाचा या वेळी विशेष उल्लेख करण्यात आला.
प्रभावळकरांचे राज ठाकरेंकडून कौतुक
या वेळी बोलताना राज ठाकरे यांनी प्रभावळकर यांच्या अभिनयातील वैविध्याचे कौतुक केले. एवढे नट अवतीभवती असताना दिलीप प्रभावळकरांनाच या भूमिका द्याव्याशा का वाटल्या? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रभावळकर यांच्या अभिनय क्षमतेचा गौरव केला. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात इतक्या वेगवेगळ्या भूमिका करणारे दिलीप प्रभावळकर हे एकमेव कलाकार असतील, असे सांगत त्यांनी प्रभावळकर यांच्या कार्याचे कौतुक केले. अशी व्यक्ती महाराष्ट्रात जन्माला आली याचा आम्हाला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.