मुंबई : 'तुमच्या नावावर मनी लाँडरिंगचा गुन्हा आहे... तुमचे बँक खाते गैरव्यवहारासाठी वापरले गेले आहे... तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे.' असा व्हिडीओ कॉल आला आणि समोर पोलिस, सीबीआय किंवा ईडीच्या गणवेशातील व्यक्ती दिसली, तर अनेकांना तो खरा अधिकारी असल्याचा भास होतो. त्यानंतर सुरू होते भीती, दबाव आणि पैशांची मागणी. प्रत्यक्षात ‘डिजिटल अरेस्ट’ नावाची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया अस्तित्वात नाही. तो सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा आहे. जाणून घेऊया डिजिटल अरेस्ट आणि घ्यावयाची काळजी.
मुंबईतील दहिसरमध्ये ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला पोलिस अधिकारी असल्याचे भासवून मनी लाँडरिंगच्या गुन्ह्याची भीती दाखवण्यात आली. त्यांच्यावर सतत ऑनलाईन नजर ठेवली जात असल्याचे सांगून तब्बल ४.५ लाख रुपये उकळण्यात आले. या प्रकरणात दहिसर पोलिसांनी २८ वर्षीय तरुणाला अटक केली.
पुण्यातील एका ८४ वर्षीय निवृत्त नागरिक आणि त्यांच्या पत्नीला चार दिवस ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली घाबरवण्यात आले. आरोपींनी स्वतःला एटीएस व सीआयडीचे अधिकारी असल्याचे सांगितले. घराबाहेर कुणी आले तर कळवा, अशा सूचना देण्यात आल्या. अखेर या दाम्पत्याकडून ५० लाख रुपये उकळण्यात आले.
‘डिजिटल अरेस्ट’चा फोन आला तर ‘हे’ करा...
फोनवरील व्यक्तीच्या दबावाला बळी पडू नका.
सरकारी यंत्रणा व्हिडीओ कॉलवर अटक करत नाही.
ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक कागदपत्रे देऊ नका. संशयास्पद कॉल तातडीने बंद करून कुटुंबीयांना माहिती द्या.
पैसे गेले असतील तर पहिल्या तासातच १९३० या सायबर हेल्पलाईनवर तक्रार करा.