मुंबई : मधुमेहाचे निदान झाल्यानंतर तीन ते पाच वर्षांत तरुणांमध्ये डायबिटिक रेटिनोपथीचा धोका झपाट्याने वाढत आहे. पूर्वी हा आजार प्रामुख्याने वयस्कर रुग्णांमध्ये दिसत असला, आता 40 वर्षांखालील व्यक्तींमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे तरुणांनी काळजी घेण्याचा सल्ला नेत्र विकार तज्ञ देत आहेत.
बदलती जीवनशैली, रक्तातील साखरेची अनियंत्रित पातळी, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि मूत्रपिंड विकारांमुळे ही स्थिती गंभीर होते. डोळ्यांपुढे ठिपके, धुसर दृष्टी, रात्री दृष्टीचा अभाव आणि रंग ओळखण्यात अडचणी ही सुरुवातीची लक्षणे आहेत. तज्ज्ञांच्या मते वेळेवर निदान आणि नियमित डोळ्यांची तपासणी केल्यास दृष्टी कायमस्वरूपी गमावण्यापासून बचाव करता येतो.
डॉ. हितेंद्र मेहता यांनी सांगितले की, रुग्ण उशिरा उपचारासाठी येतात, ज्यामुळे दृष्टी गमावण्याचा धोका वाढतो. डॉ. महेश शिव शरण सिंह म्हणाले की सुरुवातीला लक्षणे दिसत नसल्यामुळे बरेच रुग्ण आजार गंभीर झाल्यावरच उपचारासाठी येतात. धुसर दिसणे, प्रकाशाची चमक जाणवणे किंवा काळे डाग आढळल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.