धुळे/मुंबई : धुळे येथील शासकीय विश्रामगृहाच्या खोलीतून जप्त करण्यात आलेली एक कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची रोकड धुळे आणि नंदुरबार जिल्हा दौर्यावरील विधिमंडळ अंदाज समिती सदस्यांना देण्यासाठी आणल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी ‘एसआयटी’ चौकशी करण्याची घोषणा करत विधिमंडळ समितीवर प्रश्नचिन्ह उभे राहणे गंभीर असून, याची सत्यता बाहेर येऊन ‘दूध का दूध... पानी का पानी’ झाले पाहिजे, असे म्हटले आहे.
धुळे येथील शासकीय विश्रामगृहातील खोलीत विधिमंडळ पाहणी समितीसाठी बेहिशेबी रक्कम ठेवण्यात आल्याचा आरोप करीत माजी आमदार गोटे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी बुधवारी (दि. 21) 102 क्रमांकाच्या खोलीबाहेर आंदोलन केले होते. ही खोली आमदारांच्या समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहायक किशोर पाटील यांच्या नावे गुरुवार (दि. 15) पासून आरक्षित असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, याबाबत बोलताना ते म्हणाले की, विधिमंडळाची आपली एक गरिमा आहे. त्याचा आपला मान आहे. त्यामुळे या समितीवर आरोप होणे गंभीर बाब आहे. यात कोण दोषी आहे, पैसे कोणी मागितले आहेत का, या सर्वाचा छडा लावला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, गोटे यांनी कारवाईसाठी याबाबत पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह नाशिक विभागाचे महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना भ्रमणध्वनीवरून कळविले, तर रात्री शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट केल्यानंतर रात्री 11 वाजता अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, प्रांत कदम, तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या पथकाने दाखल होत इन कॅमेरा खोलीचा पंचनामा केला. यात पहाटे 2.45 पर्यंत झालेल्या पैशांच्या मोजणीत खोलीतून एक कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपये जप्त केल्याचा दावा गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
पाहणीच्या नावाखाली शासकीय खर्चाने धुळ्यात आलेल्या आमदारांची ही कमिटी खासगी हॉटेलमध्ये कशी थांबली, असा सवाल केला; तसेच विश्रामगृहाच्या खोलीत मोठी रक्कम होती. मात्र, आम्ही तेथे जाण्यापूर्वीच काही रक्कम लंपास केली गेली. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले पाहिजेत. बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी या सीसीटीव्ही यंत्रणेत हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे विश्रामगृह परिसरासह निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे सीसीटीव्हीदेखील तपासावेत, अशी मागणी गोटे यांनी केली आहे.
समितीला देण्यासाठी जिल्ह्यातून पाच कोटींहून जास्तीची रक्कम वसूल केली गेल्याचा दावादेखील गोटे यांनी केला. धुळे जिल्हा पोलिस गुंडांनाच घाबरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात हे गुंड धुळ्याला त्रासदायक ठरणार आहेत. यातून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आता प्रत्येकालाच प्रयत्न करावे लागणार आहेत, असे मतही त्यांनी मांडले.