ED  File Photo
मुंबई

DHFL Scam ED Action: वाधवानशी संबंधित ४०.४० कोटींच्या मालमत्ता ईडीकडून जप्त

कर्जतमधील फार्महाऊस आणि दिल्लीतील निवासी भूखंडाचा समावेश; बनावट सेवांच्या नावाखाली पैसे वळविल्याचा ईडीचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: डीएचएफएल आर्थिक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आणखी एक मोठी कारवाई केली आहे. वाधवान कुटुंबाशी संबंधित ४० कोटी ४० लाख रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील कर्जत येथील फार्महाऊस आणि दिल्लीतील निवासी भूखंडाचा त्यात समावेश आहे.

ईडीच्या तपासानुसार, २०१८-१९ मध्ये डीएचएफएलमधून हरीश देढिया आणि त्यांची पत्नी धारा देढिया यांच्या मालकीच्या दोन कंपन्यांना ४०.४० कोटी रुपये देण्यात आले होते.

या कंपन्यांची नावे रिलायबल सर्व्हिसेस आणि मिलेनियम सर्व्हिसेस अशी आहेत. प्रत्यक्षात कोणतेही काम न करता बनावट सेवांच्या नावाखाली हे पैसे दिल्याचा ईडीचा आरोप आहे. या पैशांतून खरेदी केलेल्या मालमत्तांवर आता कारवाई करण्यात आली आहे.

डीएचएफएलला १७ बँकांकडून ४२ हजार ८७१ कोटी रुपयांचे कर्ज मिळाले होते. मात्र, या पैशांचा गैरवापर करून बँकांचे सुमारे ३४ हजार ६१५ कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी युनियन बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

२२५ कंपन्यांच्या माध्यमातून पैशांची उलाढाल

ईडीच्या तपासात वाधवान यांच्याशी संबंधित सुमारे २२५ कंपन्यांचे जाळे समोर आले आहे. डीएचएफएलची बनावट वांद्रे शाखा दाखवून सुमारे ११ हजार ५४९ कोटी रुपये ८७ कंपन्यांकडे वळविण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच सुमारे २ लाख ६० हजार काल्पनिक कर्जदारांच्या नावाने गृहकर्ज दाखवून पैशांचा गैरव्यवहार केल्याचे तपासात समोर आले आहे.

यापूर्वी १९ ऑगस्ट २०२६ रोजी ईडीने वाधवान कुटुंबाच्या परदेशातील मालमत्तांच्या विक्रीशी संबंधित ५१.७५ कोटी रुपये गोठवले होते. या प्रकरणात आतापर्यंत १७ आरोपींविरोधात आरोपपत्र आणि आणखी पाच आरोपींविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT