Dharavi SIR case Pudhari
मुंबई

Dharavi SIR case: धारावीमधील एकाच व्यक्तीने भरले मतदार यादी नमुना ७ चे २४ अर्ज; नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नमुना ७ चे प्रतिदिन १० अर्ज दाखल करण्याच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याचा आरोप; धारावी पोलिसांत गुन्हा नोंद

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) एकाच दिवशी नमुना ७ चे तब्बल २४ अर्ज दाखल केल्याप्रकरणी धारावीतील गिरिधारी स्वामीनाथ जयस्वाल यांच्याविरोधात धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या प्रतिदिन जास्तीत जास्त १० अर्जांच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

जयस्वाल हे धारावी पूर्व येथील ९० फूट मार्गावरील गंगाधरलाल चाळीतील रहिवासी आहेत. त्यांनी १७८-धारावी विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी २४ अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

अर्ज दाखल करण्यावर मर्यादा

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई क्षेत्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या याद्यांबाबत दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

प्रारूप मतदार यादीतील नावाबाबत हरकत नोंदविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नमुना ७ च्या अर्जांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार, एका व्यक्तीला प्रतिदिन जास्तीत जास्त १० अर्ज दाखल करता येतात.

मात्र,धारावी विधानसभा मतदारसंघात एका व्यक्तीने एकाच दिवशी २४ अर्ज दाखल केल्याचा प्रकार उघडकीस आला.

लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार कारवाई

नमुना ७ मध्ये जाणूनबुजून चुकीची माहिती किंवा खोटी घोषणा केल्याचे आढळल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ अन्वये संबंधित व्यक्तीविरोधात कारवाई करण्याची तरतूद आहे.

निर्धारित मर्यादेचे उल्लंघन करून खोटी व चुकीची माहिती देत अर्ज दाखल केल्याच्या आरोपावरून जयस्वाल यांच्याविरोधात धारावी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दाखल होणाऱ्या हरकतींची वैधता आणि अचूकता महत्त्वाची मानली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT