मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाने (डीआरपी) परिशिष्ट-2 चा मसुदा प्रकाशित केला असून, धारावीच्या सरदार वल्लभभाई पटेल (एसव्हीपी) नगरातील सुमारे 65% रहिवासी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत घरासाठी पात्र ठरले आहेत. म्हणजेच 35 टक्के रहिवासी अपात्र घोषित झाले आहेत.
या दुसर्या मसुद्यानुसार, 507 निवासी गाळ्यांपैकी 332 निवासी गाळे पात्र असल्याचे आढळले आहे. परिशिष्ट -2 यादीनुसार, 201 कुटुंबे धारावीमध्येच पुनर्वसनासाठी पात्र ठरली. 131 गाळेधारकांना धारावीबाहेर निवास मिळेल. आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे आतापर्यंत फक्त 35 सदनिकाधारकांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. तथापि, अंतिम परिशिष्ट -2 प्रकाशित होण्यापूर्वी ते अजूनही सक्षम अधिकार्याकडे त्यांची बाजू मांडू शकतात. नंतरही, ते डीआरपीअंतर्गत निर्मित चार-स्तरीय तक्रार निवारण यंत्रणेकडे अपील करू शकतात.
दरम्यान, सार्वजनिक शौचालये (36), धार्मिक स्थळे (2) आणि नागरी सुविधा संरचना (1) सारख्या सार्वजनिक सुविधांसह, 179 गाळ्यांच्या कागदपत्रांच्या छाननीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट सारख्या यंत्रणांकडून सुरु आहे. ही पडताळणी पूर्ण होताच परिशिष्ट 2 अद्ययावत केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
गाळ्यांना 225 चौफू
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या करारानुसार, निवासी सदनिकाधारकांना 350 चौरस फूट घरे मिळतील,व्यावसायिक आणि औद्योगिक वापराच्या मालकांना 225 चौरस फूटपर्यंत मोफत जागा मिळेल. त्यावरील जागा टेलिस्कोपिक रिडक्शन पद्धतीवर सरकारने ठरवलेल्या बांधकाम दरांवर उपलब्ध करून दिली जाईल, असे धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडून सांगण्यात आले आहे.
डीआरपी काय सांगते?
निविदा अटी आणि शर्तीनुसार, 1 जानेवारी 2000 पूर्वी बांधलेल्या सर्व निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक संरचना धारावीतच पुनर्वसनासाठी पात्र ठरणार आहेत.
त्यानंतर 1 जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 दरम्यान बांधलेल्या तळमजल्याच्या गाळ्यांच्या, मालकांना धारावीच्या बाहेर 2.5 लाख इतक्या नाममात्र किमतीत 300 चौरस फूट घरे मिळण्याचा हक्क असेल.
1 जानेवारी 2011 नंतर, पण 15 नोव्हेंबर 2022 पूर्वी बांधलेल्या आणि वरच्या मजल्यावरील गाळेधारकांना परवडणार्या भाड्याच्या घराच्या योजनेत धारावीच्या बाहेर 300 चौरस फूट घरे मिळतील. हे लाभार्थी 12 वर्षांसाठी भाडे दिल्यानंतर घरमालक बनतील. घरांची मालकी मिळवण्यासाठी भाड्याची पूर्ण रक्कम कधीही भरण्याचा पर्याय असेल.