पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात आज (दि.६) दोषी ठरवले. त्यांच्यावरील घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप कोर्टाने मान्य करून करूणा मुंडे (Karuna Munde) हीच त्यांची पहिली बायको असल्याचे मान्य केले आहे. करूणा यांना दरमहा २ लाख पोटगी देण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
करुणा मुंडे या फैमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही. याची नोंद घ्यावी करुणा, धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये, असे निर्देश आणि १,२५,००० रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत, अशी एक्स पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
करुणा शर्मा यांनी २०२२ मध्ये घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत धनंजय मुंडे यांच्याकडे पोटगीची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने पोटगी देण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. आदेश केवळ आर्थिक विचारांवर आधारित असून अंतरिम भरपाई देण्याचे निर्देश देतो, कथित हिंसाचाराच्या कोणत्याही आरोपांवर नाही,असा खुलासा मुंडे यांचे वकील सायली सावंत यांनी केला आहे.
न्यायालयाने मुंडे यांच्याविरूद्ध कोणताही प्रतिकूल निकाल दिलेला नाही. हा आदेश केवळ अर्जदारांच्या आर्थिक गरजांवर आधारित देण्यात आला होता, कोणत्याही चुकीच्या कृत्याच्या आधारावर नाही. मुंडे यांनी स्वतः करुणा शर्मा आणि त्यांच्या मुलांसोबत पूर्वी लिव्ह-इन संबंध असल्याचे कबूल केले होते, ज्यामुळे या आदेशाचा आधार बनला.
करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील व्यक्तिगत कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याप्रकरणी न्यायालयाने कोणताही कौटुंबिक हिंसाचाराचा निष्कर्ष काढलेला नाही. मीडियाने जबाबदारीने आणि अचूक वृत्तांकन करावे, असे आवाहन सावंत यांनी केले आहे. आजचा आदेश फक्त अंतिम देखभालीसाठी रक्कम देणे बाबत इतकाच आहे. जो केवळ आर्थिक निकष लक्षात घेऊन पारित केलेला आहे. कथित हिंसाचाराच्या कोणत्याही आरोपावर आधारित नाही, असे त्यांनी म्हटले आहे.