शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी धैर्यशील माने यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.  File photo
मुंबई

Dhairyasheel Mane | शिवसेना शिंदे गटाच्या संसदीय पक्ष उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने

लोकसभा अध्यक्षांना पत्राद्वारे दिली माहिती

पुढारी वृत्तसेवा

लोकसभेतील शिवसेना शिंदे गट संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. माने यांच्या निवडीचे पत्र शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे सादर केले आहे. ७ जून २०२४ रोजी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नवनियुक्त शिवसेना संसदीय पक्षाच्या बैठकीत शिवसेना संसदीय पक्षाच्या (Shiv Sena Parliamentary Party) उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. असे एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

शिंदेंनी लोकसभेत पक्षाची जबाबदारी सोपवली युवा खासदारांवर

शिवसेना शिंदे गटाने लोकसभेत पक्षाची जबाबदारी युवा खासदारांवर सोपवलेली आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची शिवसेना पक्षाच्या लोकसभेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. आता शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

धैर्यशील माने हे हातकणंगले मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. नुकताच धैर्यशील माने यांनी अर्थसंकल्पावरील भाषणात विरोधकांचा कठोर शब्दांत समाचार घेतला होता. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून शिवसेना शिंदे गटाचे ७ खासदार निवडून आले असून केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे.

सलग दुसऱ्यांदा खासदार

लोकसभा निवडणुकीत शिंदे शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील सरूडकर, स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांना अस्मान दाखविले होते. माने यांनी सलग दुसर्‍यांदा आपली जागा कायम राखताना सरूडकर यांचा १३ हजार ४२६ मतांनी पराभव केला होता.

शिंदे सरकारच्या स्थापनेवेळी धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. यासाठी धैर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी शिंदे यांनी ताकद पणाला लावली होती. आता शिंदे यांनी धैर्यशील माने यांच्याकडे शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदाची जबाबदारी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT