anil deshmukh vs devendra fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना इशारा दिला.  File Photo
मुंबई

नादी लागणार्‍यांना सोडत नाही, देवेंद्र फडणवीस यांचा अनिल देशमुखांना इशारा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : Anil Deshmukh vs Devendra Fadnavis : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी केलेले आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळले असून, माझ्या नादी कुणी लागले तर मी सोडत नाही, असा इशाराच फडणवीस यांनी अनिल देशमुखांना बुधवारी दिला. तसेच शाम मानव हे सुपारीबाजांच्या नादी लागलेत का हे तपासावे लागेल, असे प्रत्युत्तर मानव यांना त्यांनी दिले आहे.

अजित पवारांनी गुटखा व्यावसायिकांकडून कोट्यवधीची कमाई करून मागितली, उद्धव ठाकरेंनी 300 कोटी रुपयांची वसुली मागितली, आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनचा बलात्कार करून हत्या केली, अनिल परब यांनी सत्तेचा गैरवापर केला, अशी चार शपथपत्रे द्या आणि ‘ईडी’ प्रकरणातून सुटका करून घ्या, अशी ऑफर देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांना दिली होती. देशमुखांनी फडणवीसांचा हा प्रस्ताव नाकारला आणि आणि 13 महिने तुरुंगवास भोगला, असा दावा अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला होता. त्यानंतर स्वतः देशमुख यांनी माध्यमांशी बोलून मानव यांच्या दाव्याची पुष्टी केली.

त्यावर फडणवीस यांनी, मला देशमुखांना एकच सांगायचे आहे, त्यांच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी माझ्याकडे काही ऑडिओ व्हिज्युअल्स दिलेत. त्यामध्ये अनिल देशमुख हे शरद पवार, उद्धव ठाकरे, सचिन वाझे यांच्याबद्दल काय म्हणत आहेत हे दिसतेय. रोज कुणी माझ्यावर आरोप करत असेल, तर मी शांत बसणार नाही. वेळ आली तर त्या गोष्टी मला जाहीर कराव्या लागतील. देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार होते. त्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. देशमुख त्यानंतर जेलमध्ये गेले. आताही ते बेलवर बाहेर आहेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, आपण कुणाचीही सुपारी घेतली नाही, असे प्रा. मानव यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT