मुंबई : विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी व्हा. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचे कामकाज स्थगित झाल्यास ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. मंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे एखादा प्रश्न राखून ठेवण्याची वेळ आल्यास पक्ष त्याची गंभीर दखल घेईल, असा सज्जड इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांना मंगळवारी दिला.
भाजप आमदार आणि मंत्र्यांची सोमवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत एसआयआर प्रक्रियेतील सहभाग, पक्षाचे कार्यक्रम आणि विधिमंडळातील उपस्थिती आदी बाबींवर चर्चा झाली. विशेष म्हणजे एरवीचा बडेजाव बाजूला सारत अनेक मंत्र्यांची आमदारांसमवेतच बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पक्षाने दिलेल्या कार्यक्रमांबाबत कोणतीही हयगय होता कामा नये. ते उपक्रम सर्वांना लागू होतात, त्यात मंत्री म्हणून सवलत नसल्याचा संदेशच यानिमित्ताने पक्षाने दिला आहे. सभागृहातील आमदारांच्या उपस्थितीसोबतच मंत्र्यांचा विषयही यानिमित्ताने ऎरणीवर आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्री सभागृहात नसल्याने कामकाज थांबविण्याची तसेच काही वेळा संबंधित प्रश्न राखून ठेवण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर ओढवली होती.
सभागृहातील कामकाजात सहभागी व्हा, मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचे कामकाज स्थगित झाल्यास खपवून घेणार नाही. मंत्र्यांना जाब विचारण्याबरोबरच त्यांच्या गैरहजेरीचा तपशील सभागृहातच मांडला जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यानिमित्ताने स्पष्ट केल्याचे समजते.
जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा : फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहातील दांडीबहाद्दर मंत्र्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. ‘जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, तुमच्या गैरहजेरीमुळे प्रश्न राखून ठेवावा लागला तर त्याची पक्षाकडून गंभीरपणे नोंद घेतली जाईल’, असा सज्जड इशाराच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दांडीबहाद्दर मंत्र्यांना दिल्याचे समजते.