Devendra Fadnavis on Gopichand Padalkar
मुंबई : आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षातील नेत्यांनी पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही "ज्या पक्षातील आमदाराची टीका, त्या पक्षातील नेतृत्वाने भूमिका स्पष्ट करावी," अशी मागणी केली. या सर्व वादावर अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, "गोपीचंद पडळकर यांच वक्तव्य योग्य नाही. कोणाच्याही वडिलांबद्दल बोलणं चुकीच आहे. याबाबत गोपीचंद पडळकर यांच्याशी बोललो आहे. शरद पवारांचा फोन आला होता, त्यांनाही सांगितलं आहे. अशा प्रकारच्या वक्तव्याच समर्थन करणार नाही. पडळकर आक्रमक, तरूण नेते आहेत. बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत. भविष्यात मोठा नेता म्हणून त्यांना मोठी संधी आहे, त्यामुळे बोलण्याचा काय अर्थ निघेल हे लक्षात घेऊनच बोलावं, असं सांगितलं असल्याचे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, मुख्यमत्र्यांचा आज सकाळी फोन आला होता. अशा प्रकारची वक्तव्ये टाळावीत, असे त्यांनी सांगितल्याची स्पष्टोक्ती पडळकर यांनी दिली.
या वादग्रस्त टीकेनंतर शरद पवार यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आपली नाराजी व्यक्त केली. "अशा प्रकारची पातळी सोडून केलेली टीका योग्य नाही. या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो," असे शरद पवार यांनी फडणवीसांना सांगितले.