मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस pudhari photo
मुंबई

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांनी मोडला शरद पवारांचा विक्रम; सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषविणार्‍यांत तिसर्‍या स्‍थानी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविणार्‍या नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस हे तिसर्‍या स्थानी पोहोचले आहेत. यापूर्वी हा विक्रम शरद पवारांच्या नावे होता. फडणवीस यांच्‍या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीला २ हजार ४३० दिवस पूर्ण झाले आहेत. तर, शरद पवारांची मुख्यमंत्रिपदाची एकूण कारकीर्द २ हजार ४१२ दिवसांची राहिली आहे.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ राहिलेले तिसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. यापूर्वी या स्थानावर शरद पवारांचे नाव होते. देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पुढील पाच वर्षे सलग मुख्यमंत्रिपदावर राहून त्यांनी या पदाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर, राजकीय इतिहासात गाजलेल्या ‘पहाटेच्या शपथविधी’नंतर २३ नोव्हेंबर २०१९ रोजी ते दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदावर आले. मात्र, हा प्रयोग अवघ्या ८० तासांत आवरता घ्यावा लागला. त्यानंतर, ५ डिसेंबर २०२४ रोजी फडणवीस हे तिसर्‍यांदा महाराष्ट्राच्‍या मुख्यमंत्रिपदी आरूढ झाले असून ही तिसरी कारकीर्द सध्या चालू आहे. त्यामुळे ३१ ऑक्टोबरपासून रविवार, १२ जुलै २०२६ पर्यंतचा ताळेबंद मांडल्यास फडणवीस हे एकूण ६ वर्षे ७ महिने म्हणजेच २ हजार ४३० दिवस मुख्यमंत्रिपदी राहिले आहेत. तर, शरद पवार हे सुमारे ६ वर्षे २२१ दिवस म्हणजेच साधारणत: २ हजार ४१२ दिवस मुख्यमंत्रिपदावर होते. विशेष म्हणजे, चारवेळा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची त्यांनी शपथ घेतली. मात्र, त्यापैकी एकदाही सलग पाच वर्षांचा कार्यकाळ ते पूर्ण करू शकले नाहीत.

महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांची यादी :

वसंतराव नाईक :

११ वर्षे ७८ दिवस (४ हजार ९६ दिवस)

विलासराव देशमुख : सुमारे ७ वर्षे १२९ दिवस (२ हजार ६८६ दिवस)

देवेंद्र फडणवीस :

सुमारे ६ वर्षे ७ महिने (२ हजार ४३० दिवस/१२ जुलै २०२६ पर्यंत)

शरद पवार : सुमारे ६ वर्षे २२१ दिवस (२ हजार ४१२ दिवस)

सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविणार्‍यांच्‍या यादीत वसंतराव नाईक यांचे नाव पहिल्या स्थानी आहे. ५ डिसेंबर १९६३ रोजी मुख्यमंत्री बनलेले वसंतराव नाईक हे तब्बल ११ वर्षे ७८ दिवस या पदावर होते. सुमारे ४ हजार ९६ दिवस ते राज्याचा कारभार हाकत होते. विशेष म्हणजे, मुख्यमंत्रिपदाची त्यांची ही प्रदीर्घ कारकीर्द सलग होती, त्यात खंड नव्हता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT