मुंबई : संयम आणि सकारात्मकता हे आजवरच्या माझ्या प्रवासाचे गुपित आहे. येणार्या प्रत्येक आव्हानाला सकारात्मकतेने सामोरा गेलो. फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उभा झालो नाही. अनेकदा लोकांना वाटले की माझी राख होते आहे आणि तेवढ्यात मी भरारी घेतली. आव्हानांपासून कधीही पळ काढला नाही. त्यामुळे भरारी घेऊ शकलो. कधी कुणाचा द्वेष केला नाही, माणसे झुंजविली नाहीत किंवा टोकाचे राजकारण केले नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या यशस्वी राजकीय प्रवासाचे गुपित उलगडले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित फिनिक्स विशेष सन्मान सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, दैनिक पुढारीच्या मुंबई आवृत्तीचे संपादक विवेक गिरधारी, ज्येष्ठ पत्रकार विजय बाविस्कर, निलेश खरे, सरिता कौशिक आणि मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जीवनावरील विशेष व्हिडीओ बुकचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आजवरच्या राजकीय जीवनात अनेक पदे भूषविली; परंतु पुरस्कार आणि सत्कार घेणे टाळले. आपल्या हातून सत्कार्य झाले असे वाटेल तेव्हा सत्कार घ्यावा, या भावनेने काम करत राहिलो. मात्र, आज गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे आजचा पुरस्कार स्वीकारण्याची संधी साधल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पत्रकार आणि राजकारणी हे लोकशाहीच्या गाड्याची दोन चाके आहेत. ही दोन चाके एकमेकांसोबत चालली तरच लोकशाही योग्य रुळावर राहते. टीका करणे हा पत्रकारांचा अधिकार आहे, पण त्याच वेळी आमची बाजूही ऐकून घ्यावी. लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी पत्रकारितेचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. पत्रकारांना भेडसावणार्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात पत्रकारिता अधिक कठीण झाली आहे. कोविडनंतर तर आव्हान अधिक वाढले. पत्रकार दिवस-रात्र रस्त्यावर असतात. हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ मजबूत राहावा म्हणून सरकारकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सकारात्मक विचारसरणीने अनेक पिढ्यांसाठी उपयुक्त ठरणारी कामे करता आली. जलयुक्त शिवार योजना, शेतकर्यांची निराशा दूर करणारे उपक्रम ही गुरुदेवांच्या प्रेरणेतून शक्य झाली. आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यकर्त्यांनी सरकारसोबत खांद्याला खांदा लावून जलसंधारणाच्या कामांत योगदान दिले. भारतीय योग, आयुर्वेद, चिकित्सा व परंपरांना जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यात श्री श्री रविशंकर यांचे मोठे योगदान आहे. भारतीय विचार जगभर पोहोचवण्याचे आणि मानवतेचा धर्म शिकवण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या हस्ते मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी विशेष अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी यावेळी पत्रकार यांनी सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले.