मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी कर्नाटकमध्ये आमदार रोहित पवार यांनी दाखल केलेला झीरो एफआयआर बेकायदेशीर आहे. राजकीय दृष्टिकोन ठेवून आणि महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हे कृत्य केले आहे, असा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अजित पवार यांचा विमान अपघात हा घातपात असेल तर आकाशपाताळ एक करू; पण कोणाच्या बापालाही सोडणार नाही, अशी ठाम ग्वाही विधानसभेत दिली. कटकारस्थान करणाऱ्यांचा मुडदाही खणून काढण्याचा इशारा त्यांनी दिला.
हा अपघात घातपात असल्याचे कोणतेही पुरावे अद्याप समोर आले नसल्याचेही त्यांनी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले. रोहित पवार यांच्या भूमिकेवरदेखील फडणवीस यांनी आपण अपघाताच्या चौकशीच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले आहे. याप्रकरणी केंद्र सरकारने ‘एसओपी’नुसार कारवाई सुरू केली. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडेदेखील आपण चौकशी दिली आहे.
पायलट सुमीत कपूर, को-पायलट शांभवी पाठक यांच्या ब्रेथ ॲनालायझर टेस्टमध्ये अल्कोहोलचा अंश नव्हता. या प्रकरणात मुंबईच्या विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अजित पवार आल्याचे तसेच विमानात बसल्याचे दिसते. परंतु, बारामती विमानतळावर हे विमान लँड होण्यापूर्वीच दुर्घटनाग्रस्त झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अजित पवार व इतर चार यांचे मृत्यूचे कारण ‘डेथ ड्यू टू मल्टिपल इन्जुरीज असोसिएटेड विथ बर्न इन्जुरीज,’ असे देण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त विमानातील मृत पावलेल्या सर्व पाचजणांचा व्हिसेरा व रक्त तपासणीत विषाचाही अंश आढळून आलेला नाही.