Devendra Fadanvis Pudhari
मुंबई

NCP Merger : आमच्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण होणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणावरून राज्यात पुन्हा उलटसुलट चर्चां रंगल्या असताना याबाबत सुरू असलेल्या घडामोडींची माहिती त्या दोन्ही पक्षांचे अध्यक्षच देऊ शकतात. इतर नेत्यांकडून याबाबत केल्या जाणाऱ्या विधानांना काहीही अर्थ नाही. दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण आमच्याशिवाय होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्याचवेळी राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याबाबत ठाम असून सरकारची याबाबतची भूमिका घटनात्मक असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दिवाळीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासह गोकुळ दूध संघाची निवडणूक, दुष्काळमुक्त महाराष्ट्राची योजना, समान नागरी कायदा, दिशा सालियन मृत्यू प्रकरण, महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा आणि महायुती सरकारच्या कामकाजावर भाष्य केले. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत बोलताना, नेमके काय सुरू आहे हे खासदार शरद पवार किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारच सांगू शकतील. या दोन्ही नेत्यांनी दिलेली माहितीच ग्राह्य धरली पाहिजे. इतर नेते याबाबत काय बोलतात, त्याला काहीही अर्थ नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

सत्तेत असूनही भाजप मोर्चे, आंदोलन करत असल्याबद्दल होणाऱ्या टीकेलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. राहुल गांधी हे सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, संसद, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक तसेच रिझर्व्ह बँक यांसारख्या घटनात्मक संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. जनतेच्या मनात अविश्वास निर्माण करीत आहेत. लोकशाहीत मतभेद असू शकतात. मात्र घटनात्मक संस्थांचा सन्मान राखणे आवश्यक आहे. विरोधकांनी संसदीय मार्गाऐवजी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका घेतल्यास भाजपही रस्त्यावर उतरून त्यांना उत्तर देईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT