CM Devendra Fadnavis |  
मुंबई

Devendra Fadnavis : कोणाचेही पाणी वळविण्याचा विषय नाही

कोयनेतील पाण्याबाबत फडणवीस यांची भूमिका

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : कुठेही कोणाचे पाणी पळवण्याचा विषय नाही, कोयना वीज निर्मिती प्रकल्पातून वाया जाणारे पाणी उचलून महाराष्ट्राच्या वापरात आणायचे आहे. त्यामुळे प्राथमिक अवस्थेत असलेल्या प्रकल्पावरून अभ्यास न करता वाद उभा करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

कोयना वीज प्रकल्पातील वाया जाणारे पाणी मुंबईला वळवण्याचे सुतोवाच नुकतेच फडणवीस यांनी केले आहे. पण या प्रस्तावावर महायुतीच्या नेत्यांच्या विरोधी भूमिका आहेत.

अभ्यास न करता बोलतात

कुठलाही अभ्यास न करता अनेक लोक या प्रश्नावर बोलत आहेत, कोयनेचे ६० टीएमसी पाणी आपण वीज बनवल्यानंतर सोडून देतो, ते पाणी कोणाच्याही उपयोगाला न येता ते थेट समुद्रात जाते, त्यावर आपण अभ्यास करत आहोत, वाहून जाणारे पाणी वर उचलावे लागेल, हे काम सोपे नाही. हे पाणी मुंबईकडे आणता आले, तर कोकणातील अनेक प्रकल्पांवर जो ताण आहे, तो ताण कमी करता येईल, मुंबईला स्वयंपूर्ण करता येईल असेही फडणवीस म्हणाले.

कोकणाचाही विचार करू

कुठलंही पाणी उचलले आणि घेऊन गेलो, अशा पद्धतीचा विचार नाही, आपल्याला कधीकधी आश्चर्य वाटते की गेली ५०-६० वर्षे हे पाणी वाहून चालले आहे. कोयना प्रकल्प झाल्यापासून ते समुद्रात जात आहे. सिंचनासाठी थेंबाचाही वापर होत नाही, तरी कोणीही त्याचा विचार करत नाही. आज आपण विचार चालू केल्यावर त्याच्यावर वादंग होतो, हे चुकीचे आहे, असेही फडणवीस म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT