Devendra Fadnavis on Raj Thackeray
मुंबई : महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी शिवतीर्थावर चहाला बोलावलं तर मी आनंदाने जाईल, असं सुचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आज (दि. ९) 'पुढारी न्यूज'ला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "कुणीही माझे शत्रू नाही. आमची लढाई वैचारीक आहे. राज ठाकरे आता आमच्यावर टीका करत आहेत. त्यांच्या टोकाच्या टीकेला टोकाचे उत्तर देईन. मात्र, निवडणूक झाल्यानंतर जर त्यांनी चहाला बोलवलं तर, मी आनंदानं जाईल. ते माझ्या घरी येऊ शकतात मी त्यांच्या घरी जाईन," यानंतर मातोश्रीवर जाणार का? असं विचारले असता ते म्हणाले, "मातोश्रीचे दारे माझ्यासाठी २०१९ मध्येच बंद झाली आहेत."
राज्यातील सर्व २९ महापालिका निवडणुकांमध्ये आमची स्थिती चांगली आहे. भाजप नंबर वन पक्ष राहील. किमान २७ महापालिकांमध्ये महायुतीतील तीन पक्षांपैकी एका पक्षाचा महापौर असेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री नागपुरात केला.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईला बॉम्बे करण्याचा भाजपचा डाव आहे. या शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी त्यांना फार गांभीर्याने घेत नाही. त्यांच्याकडे सांगण्यासारखे, दाखवायला काहीच नाही. गेली २५ वर्षे त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे अफवांचा बाजार उठवून मते मिळवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. मात्र, यावर जनता विश्वास ठेवणार नाही. येत्या १६ जानेवारी रोजी मनपा निवडणुकीच्या निकालात हे स्पष्टपणे दिसेल, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शंभर टक्के पराभव डोळ्यांसमोर दिसत असल्याने ठाकरे याप्रकारे बोलत असल्याचा दावा केला.