मी आता भाजपमध्ये जाणार नाही, असे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले.  file photo
मुंबई

देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षांपूर्वी राज्यपालपदाची ऑफर दिली होती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी केला. फडणवीस यांनी मनापासून प्रयत्न करेन, असे मुलीची शपथ घेऊन आश्वासन दिले होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. फडणवीस यांनी राज्यपालपदाचा हा प्रस्ताव पाच वर्षांपूर्वी दिला होता, असा दावाही त्यांनी केला आहे.

दिल्लीतल्या एका अतिज्येष्ठ नेत्याने मला फोन केल्याने भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आणि आणि माझा पक्ष प्रवेश झालाही. मात्र पक्षातर्फे अद्याप जाहीर घोषणा करण्यात आली नसल्याचे खडसे यांनी सांगितले. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात असून आता राष्ट्रवादीचे काम करीत राहीन, असेही ते म्हणाले.

2019 मध्ये मला एक दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी बोलावले. ते मला म्हणाले, नाथाभाऊ तुमची मी राज्यपालपदासाठी शिफारस करतो. त्यावर मी म्हणालो, देवेंद्रजी खरे सांगा, तुम्ही मला अनेकदा सांगितलं की, हे करणार, ते देणार... ते काहीही झालेले नाही. त्यामुळे माझा विश्वास बसत नाही. मी म्हटले राज्यपाल केले तर आनंदाची गोष्ट आहे. पण माझा विश्वास बसत नाही. ते म्हणाले, माझ्या एकुलत्या मुलीची शपथ घेऊन सांगतो, हा देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे. पुढे काय झालं मला माहीत नाही. पण फडणवीस यांनी मला आश्वासन दिले होते, असे खडसे म्हणाले.

मी दिल्लीत असताना जे. पी. नड्डा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश झाला. यावेळी रक्षा खडसेही उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी माझ्या गळ्यात भाजपचा मफलर घातला. या घटनेला 5 ते 6 महिने होऊनही भाजपने माझा प्रवेश झाल्याचे घोषित केले नाही. अजून मी वाट पाहतोय. पण अजून काही घोषणा झाली नाही. त्यामुळे यापुढे भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर आपण फुली मारलीय, असेही खडसे म्हणाले. मी भाजपत प्रवेश घेतो, असे कधी म्हणालो नव्हतो. मला प्रवेश घ्या, असे म्हणाले होते. त्यानंतर मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून गेलो होतो. 40 वर्षे भाजपचे काम केले. पक्षासाठी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. इतके सगळे करूनही भाजपमध्ये मला प्रवेश द्या, ही विनंती करणे माझ्यासाठी अतिशय अपमानास्पद आहे, असे ते म्हणाले.

तो व्हिडीओ डिलिट झाला

खडसे यांनी आपल्याकडे भाजप नेत्याची एक वादग्रस्त सीडी असल्याचे व ईडीची नोटीस आली की सीडी वाजवेन, असा इशारा दिला होता. ही सीडी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या अश्लील चाळ्यांची असल्याचे त्यांनी म्हटले होते. यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, व्हिडीओ क्लिप आपल्या मोबाईलमधून डिलिट झाली असून ती कशी डिलिट झाली हे आपल्याला कळलेले नाही. या क्लिपमध्ये एक नेता एका मुलीसोबत अश्लील चाळे करीत असल्याचे दृश्य होते, असे ते म्हणाले. ज्या व्यक्तीने आपल्याला ही क्लिप दिली त्याला पैसे देण्यात आले होते. त्याने एक कोटीचे घर घेतले. त्यानेही ही क्लिप डिलिट केली, असे खडसे म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT