मुंबई: उद्योग क्षेत्रात सर्वाधिक कंपन्या महाराष्ट्रातच आहेत, दरवर्षी सुरू होणार्या नव्या उद्योगांच्या यादीतही महाराष्ट्राच पहिल्या क्रमांकावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र क्रमांक एकवर होता आणि कायम क्रमांक एकवरच राहील... अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत ३६ हजार उद्योग बंद होत असल्याच्या आरोपानंतर वस्तुस्थिती समोर आणली.
त्याचवेळी डिफंक्ट, डिसफंक्शनल कंपन्या ज्या सुरूच झाल्या नाहीत, त्यासंदर्भातील माहितीवर नवख्या नेत्यांनी सोयीचा अर्थ काढला आणि पोस्ट केल्या; पण आपण सुजाण आणि ज्येष्ठ नेते आहात.
तुमच्या मनात कोणता गैरसमज राहू नये, यासाठी हा लेखनप्रपंच म्हणत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार यांना थेट उत्तर दिले. शरद पवार यांच्या पोस्टलाच मुख्यमंत्र्यांनी ‘रिप्लाय’ केला. त्यासाठी डेटा आणि फोटो जोडत उद्योगमंत्री उदय सामंत यांनाही टॅग केले.
संसदेत खा. राजाभाऊ वाजे यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात राज्यातील ३६ हजार २११ कंपन्या बंद झाल्या, अशी माहिती देण्यात आली. काही नवख्या नेत्यांनी सोयीचा अर्थ काढून पोस्ट केल्या आणि त्याच्या बातम्या झाल्या; पण आपण कायम महाराष्ट्रहिताचा विचार करणारे सुजाण आणि ज्येष्ठ नेते आहात, त्यामुळे आपल्या मनात कोणता गैरसमज राहू नये, म्हणून हा थोडा विस्ताराने लेखनप्रपंच, असे फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
ज्या कंपन्या बंद होतात, त्यातील ७६ टक्के या डिफंक्ट म्हणजे ज्या कधी सुरूच झाल्या नाहीत अशा आहेत! त्या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली, तरच इतर तपशील मिळू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुदैवाने संपूर्ण माहिती ही पारदर्शीपणे संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपण कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर गेलात, तर तेथे आपल्याला संपूर्ण माहिती प्राप्त होऊ शकते.
माध्यमांमधील बातम्यांनी तर अनेक कंपन्या बंद झाल्या, असा आभास निर्माण झाला. त्यामुळे त्यांना हा विषय अधिक तपशिलात कळावा, म्हणून येथे काही माहिती देतो आहे. देशात एकूण ३१ लाखांहून अधिक कंपन्या रजिस्टर्ड आहेत. त्यापैकी सुमारे २१ लाख कंपन्या या आज सक्रिय आहेत.
२०१५-१६ मध्ये भारतात सक्रिय कंपन्यांची संख्या ६,७८,७६८ इतकी होती, ती आता २१,१७,७४७ इतकी आहे. म्हणजेच गेल्या १० वर्षांत मोदी यांच्या नेतृत्वात सक्रिय कंपन्यांच्या संख्येत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे.
आता सर्वाधिक कंपन्या असलेल्या देशातील आघाडीच्या राज्यांची यादी पुढीलप्रमाणे.आजही सर्वाधिक कंपन्या महाराष्ट्रात ३,९६,२११, त्याखालोखाल दिल्ली : २,७२,३४२, तिसर्या क्रमांकावर, उत्तर प्रदेश : १,८५,९८२ आहे.
२०१९-२० या एकाच वर्षी काॅर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने एक विशेष मोहीम राबवून ६ लाख कंपन्या रद्द केल्या.
नवीन कंपन्यांची नोंदणी (टॉप टेन राज्य)
दरवर्षी सुमारे १ लाख नवीन कंपन्यांची देशात नोंदणी होत असते. त्यात दरवर्षी महाराष्ट्र सर्वात पुढे असतो. २०२५-२६ च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र : ४१,५२५, दिल्ली : २०,२७२, उत्तर प्रदेश : २७,४९४, कर्नाटक : १७,८५७, तामिळनाडू : १७,०२४, तेलंगणा : १७,३००, गुजरात : १४,६६६ आणि पश्चिम बंगाल : १०,५९८ कंपन्या.
एकही उद्योग चाकणमधून बाहेर जाणार नाही
चाकणमध्येे काही समस्या निश्चितपणे आहेत. मंत्री उदय सामंत तेथे लक्ष घालत आहेत. एमआयडीसीच्या पुढाकाराने समस्येवर तोडगा काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन आराखडा निश्चित करण्यात आला आहे. एकही उद्योग तेथूनही बाहेर जाणार नाही, असाच आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्र उद्योगस्नेही आहेच. म्हणून सातत्याने परकीय गुंतवणूक ही राज्यात अधिक येते. सातत्याने क्रमांक एकवर आपण आहोत आणि राहू, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.