मुंबई : ‘पुढारी न्यूज महासमिट २०२६’मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करताना पुढारीचे समूह संपादक व चेअरमन डॉ. योगेश जाधव, सोबत पुढारीचे चेअरमन इमेरिट्स‌ व मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव. Pudhari
मुंबई

Pudhari News Mahasummit 2026: ‘दिमागी नक्षल’ विचारांचा महाराष्ट्र तर हॉटबेड !

यूपीए सरकारने जाहीर केलेल्या अर्बन नक्षलींच्या यादीत ७० टक्के संघटना महाराष्ट्रातल्या होत्या : मुख्यमंत्री फडणवीस

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सीजेपीचे सुरू झालेले आंदोलन, त्‍यासोबतच राहुल गांधी यांनी हाती घेतलेला ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम आणि भाजपची तिरंगा यात्रा अशा तिहेरी आंदोलनांच्या वातावरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली स्पष्ट भूमिका पुढारी महासमिटमध्ये दिलेल्या मुलाखतीत मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात दिमागी नक्षल असा शब्दप्रयोग केला होता. त्‍याचा धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र तर अशा विचारांचा हॉटबेड आहे!

महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणार्‍या आंदोलनाच्या काळात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यात झालेल्या भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सोशल मीडिया वापरण्याचे आवाहन भाजप नेत्‍यांना केले. त्‍याच संदर्भाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी झालेली ही प्रश्नोत्तरे-

प्रश्न - पुण्यातल्या भाषणात तुम्ही भाजप नेत्यांना सोशल मीडियाचा वापर वाढवायचे आवाहन केले. पण, २०१४ मध्ये व्हाॅट्सॲप, ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून भाजपने तरुणाईला आपल्याकडे आकर्षित केले होते. मग आताचे तुमचे आवाहन म्हणजे या मधल्या काळात तयार झालेल्या 'गॅप'ची कबुली म्हणायची का ? काँग्रेसचा एक मार्ग, दुसरा सीजेपीचा तिसरा अन्य आंदोलकांचा, असे काही आहे का?

मुख्यमंत्री फडणवीस : मला असे वाटत नाही की, कोणतीही गॅप तयार झालेली. शेवटी लोकशाहीमध्ये १०० टक्के लोकं तर तुमच्या बाजूने नसतात. काही तुमच्या बाजूने असतात, काही विरोधक असतात. पण, आजही ज्याला तुम्ही जेन झी किंवा मिलेनियल्स म्हणता त्याला मी युवा शक्ती म्हणतो. या युवांमध्ये आजही प्रामाणिकपणे सर्वेक्षण केले तर ही सारी युवाशक्ती पंतप्रधान मोदी यांच्याच पाठिमागे असल्याचे दिसेल. आजही त्यांचीच क्रेझ आहे. शेवटी जे लोक त्या आंदोलनामध्ये आपल्याला दिसले, त्यांचे प्रोफाइलिंग केल्यानंतर काही बाबी लक्षात येत आहेत. काहीजण जेन्युइनली आले होते. काही नकळत आले होते. काही हौसे-नवसे-गवसे देखील होते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, वाहत्या गंगेत हात धुण्यासाठी काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोकही आले होते.

त्यामुळे, अशा आंदोलनामुळे कुठेतरी भाजपचा कनेक्ट कमी आहे, मोदींचा कनेक्ट कमी आहे, असे समजण्याचे कारणच नाही. सातत्याने मतदारदेखील वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाजपलाच मतदान करतो आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, आम्हाला अधिक संवाद साधावा लागेल. कम्युनिकेशनची माध्यमे बदलली आहेत. आता वेगळी माध्यमे आहेत. त्यामुळे वेळ बदलते तसे आम्हालाही बदलावे लागते, हेच मी आमच्या पक्षातील नेत्यांना सांगितले. बाकी भारत असो, महाराष्ट्र असो किंवा युवा शक्ती, ही आमच्या सोबत आहे आणि आमच्या सोबतच राहील.

प्रश्न - मग, आता महाराष्ट्रामध्ये एकीकडे सीजीपीवाले आंदोलन करत आहेत, राहुल गांधीही आले होते. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपची तिरंगा यात्रा सुरू झाली का?

मुख्यमंत्री फडणवीस : तिरंगा यात्रेला प्रत्युत्तर म्हणणे चुकीचे ठरेल. गेल्या सहा वर्षांपासून आम्ही दरवर्षी तिरंगा यात्रा काढतो आहोत. मी स्वतः देखील या तिरंगा यात्रेत असतो. त्यामुळे हे काही प्रत्युत्तर वगैरे नाही आणि सध्या जे काही सुरू आहेत ते मिळून-मिसळून चालू आहे. काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे जे 'बॅगेज' आहे, त्याच्या वजनाखालीच काँग्रेस दबली जाते. आपल्या चेहऱ्यावर भाजपचा मुकाबला करता येणार नाही, हे काँग्रेसला माहीत आहे. त्यामुळेच आता हे असे सामूहिक प्रयत्नांचे प्रयोग सुरू झाले आहेत. या आधी भारत जोडोमध्येही १८० अर्बन नक्षली संघटनांचा सहभाग होता. विशेष म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या काळात त्यांच्याच सरकारने लोकसभेत या अर्बन नक्षलींची यादी मांडली होती. या यादीतल्याच अनेक संघटनांना एकत्र करून भारत जोडोची मोट बांधली होती.

काही प्रमाणात ते लोकसभेमध्ये यशस्वी झाले. त्यांनी नॅरेटिव्ह बदलला होता. त्यानंतर आमच्याही लक्षात आले. त्यांचे अस्त्र-शस्त्र आणि कार्यपद्धती ही आमच्या लक्षात आल्याबरोबर हा सगळा फेक नॅरेटिव्ह आम्ही खोडून काढला. आम्ही थेट नॅरेटिव्हने लोकांसमोर गेलो. विधानसभेमध्ये आम्हाला अत्यंत चांगलं यश मिळाले. आता पुन्हा त्याच रेसिपीकडे काँग्रेस वळलेली आहे. अलीकडेच सीजेपीची महाराष्ट्रात मीटिंग झाली. सीजेपी म्हणजे तुम्हाला कदाचित दीपके किंवा दिल्लीतील आणखी दोन-तीन पोरं वाटत असतील. पण, हा सीजेपीचा फक्त चेहरा आहे. त्या ज्या १८० संघटना, ज्यांनी 'भारत जोडो' मध्ये काम केले होते, त्याच संघटना सीजेपी सोबत एकत्रित आहेत. पुढच्या काळात जेव्हा आंदोलने होतील, त्यावेळी हेच चेहरे तुम्हाला दिसतील. म्हणून मी पुण्यात सांगितले की, यांची दारू तीच आहे, बाटली नवीन आहे. नवीन बाटलीमध्ये पुन्हा जुनी दारू भरण्याचा प्रयत्न आहे. सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम आहे. राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना असा ज्यावेळेस सामना होतो, त्यावेळी राजकीय पक्षाला काही मर्यादा असतात. सामाजिक संघटनेला मर्यादा पाळाव्या लागत नाहीत. ते कसेही बोलू - वागू शकतात, काहीही करू शकतात. राजकीय पक्ष एक प्रकारे लोकांना उत्तरदायी असतात. म्हणून आता आम्हाला नीती-रीती बदलावी लागेल, ती आम्ही बदलू. आणि पुन्हा एकदा या फेक नॅरेटिव्हची फॅक्टरी आम्ही उद्ध्वस्त करू.

प्रश्न - पंतप्रधानांनी दिमागी नक्षल म्हटले, आधी अर्बन नक्षल होता. महाराष्ट्रामध्ये तुम्ही मुख्यमंत्री आहात, गृहमंत्रीसुद्धा आहात. हा जो काही दिमागी-अर्बन नक्षल प्रकार आहे, हा महाराष्ट्रातसुद्धा तुम्हाला जाणवतो का?

मुख्यमंत्री फडणवीस : महाराष्ट्र हा तर त्यांचा 'हॉटबेड' आहे. ज्यावेळी २०१३ साली यूपीए सरकारने लोकसभेमध्ये अर्बन नक्षलींची यादी जाहीर केली होती, त्यामध्ये ७० टक्के संघटना या महाराष्ट्रातल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये ज्यांचे मुख्यालय किंवा काम आहे, अशा त्या संघटना होत्या. त्यामुळे महाराष्ट्र ही त्यांची प्रयोगभूमीच आहे. आणि यांनी आता नवीन मोडस ऑपरेंडी चालवली आहे. आता ते संविधानाचे नाव घेतात. हातातले संविधान दाखवतात. लोकांना संविधानाच्या शपथा देतात. पण, संविधान उलथवून टाकण्याची कार्यपद्धती अगदी बेमालूमपणे हे लोकांकडून राबवून घेतात. संविधानाने तयार केलेल्या जेवढ्या संस्था आहेत, त्या संस्थांवरचा लोकांचा विश्वास उडाला पाहिजे, न्यायालयावरचा विश्वास उडाला पाहिजे, निवडणूक आयोगावरचा विश्वास उडाला पाहिजे, रिझर्व बँकेवरचा विश्वास उडाला पाहिजे, कॅगवरचा विश्वास उडाला पाहिजे, संविधानाने वर्षानुवर्ष ज्या संस्था तयार केल्या, त्या स्वतंत्र - स्वायत्त संस्थांबद्दल लोकांच्या मनामध्ये खोटे नॅरेटिव्ह तयार करायचे प्रयत्न आहेत. रोज काही ना काही खोटं नॅरेटिव्ह टाकायचे. त्यातून एक दिवस एक पिढी अशी तयार होईल की, ज्यांना संविधानाने तयार केलेल्या संस्था आम्हाला न्याय देऊ शकत नाहीत, असे वाटेल.

ज्या क्षणी संविधानाने तयार केलेल्या संस्था न्याय देऊ शकत नाहीत, अशी भावना तयार होईल, तीच पिढी हे संविधान उलथवून टाका म्हणायला सुरुवात करेल. अशीच त्यांची योजना आहे. विरोधकांच्या हातातील संविधानाला लाल कव्हर आहे. मात्र, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला निळे कव्हर आहे. यांच्या लाल कव्हरच्या संविधानात माओवादाचे लाल पुस्तक आहे. त्यामुळे हा काही साधा मुकाबला नाही. वेगवेगळ्या रूपाने आपल्या संविधानाला संपवण्याकरिता, जे स्वतःला संविधानाचं रक्षक समजतात अशाच लोकांच्या माध्यमातून संविधानावर हल्ला करायचा, अशा प्रकारचे हे षड्‌यंत्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT