मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. या प्रचाराच्या शर्यतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सर्वाधिक म्हणजेच तब्बल 36 जाहीर सभा घेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर दुसरीकडे, युती करून निवडणुकीला सामोरे जाणारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंनी मात्र सर्वात कमी सभा घेतल्या आहेत.
फडणवीस यांचा झंझावात : 77 इव्हेंटस्सह हायव्होल्टेज प्रचारात मुख्यमंत्र्यांनी केवळ सभाच घेतल्या नाहीत, तर 33 मीडिया मुलाखती आणि 6 विशेष संवादात्मक मुलाखतींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मुंबईत 7, नागपुरात 5 आणि उर्वरित महत्त्वाच्या शहरांत प्रत्येकी 1 सभा घेत त्यांनी भाजपची बाजू भक्कमपणे मांडली.
महायुतीतील इतर नेत्यांच्या सभा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 29 सभा घेत आपल्या गटाची ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, तर अजित पवार यांनी पुण्याला केंद्रस्थानी ठेवून 25 सभा घेतल्या (ज्यापैकी 21 सभा केवळ पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये होत्या). काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही 26 सभा आणि पदयात्रांच्या माध्यमातून काँग्रेसचे अस्तित्व टिकवण्यासाठी धावपळ केली.
ठाकरे बंधूंचा संयमित प्रचार
या निवडणुकीत सर्वात मोठी चर्चा होती ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची. मात्र, या दोन्ही नेत्यांनी प्रत्यक्ष सभा घेण्याऐवजी निवडक ठिकाणीच ताकद लावल्याचे दिसून आले. दोघांनी प्रत्येकी केवळ 3 सभा घेतल्या आहेत. यामुळे या कमी सभांचा फायदा होणार की फटका, हे 16 जानेवारीच्या निकालातूनच स्पष्ट होईल.