Devendra Fadnavis on Jain Muni controversy : "अनेकवेळा चर्चेत राहण्यासाठी काही लोक वादग्रस्त विधानं करत असतात, मात्र अशा वादग्रस्त गोष्टींमुळे मते मिळत नाहीत. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणे आणि समाजात तेढ निर्माण करणे बरोबर नाही," अशा शब्दांत ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या आगमनासाठी रस्त्यावर पांढऱ्या रंगाची पट्टी रंगवण्यावरून सुरू असलेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
वर्सोवा ते भाईंदर नॉर्थकोस्टल रोडची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपल्या संस्कृतीत एकमेकांचा आदर करणे आवश्यक असून, कोणत्याही समाजाच्या परंपरेचा आदर केलाच पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अजित पवारांच्या निधनानंतर अर्थखातं मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्याकडे ठेवले आहे. शनिवारीच माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांनी फडणवीस यांच्याकडेच अर्थखातं ठेवणे शहापणाचे ठरेल अशी सूचना केली होती. यावर राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करत अर्थमंत्रीपदावर आपला दावा सांगितला होता. या पार्श्वभूमंवर अर्थखातं कोणाकडे जाणार, याबाबत मुख्यमंत्र्यांनी एक सूचक विधान केले. "महायुतीत अर्थखातं सांभाळण्यासाठी अनेक सक्षम आणि चांगले नेते आहेत," असे म्हणत त्यांनी जागावाटप आणि खातेवाटपाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
यंदाच्या पावसाळ्याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, यंदा राज्यात कमी पावसाचे संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासन पूर्णपणे सतर्क असून 'वॉररुम'च्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच राज्यातील सर्व प्रलंबित विकासकामांचा सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, " मुंबईतील ६०% वाहतूक थेट 'वेस्टर्न एक्सप्रेसवे'वरून होते आणि त्यावरचा ताण कमी करण्यासाठी आम्ही नरिमन पॉइंट ते भाईंदर असा सिग्नल-मुक्त रस्ता तयार करत आहोत. हा संपूर्ण प्रकल्प ऑक्टोबर-नोव्हेंबर किंवा डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे."