मुंबई: देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून वानखेडे मैदानावर घेतलेल्या पहिल्या शपथेला आज शनिवारी ३१ ऑक्टोबर, २०२६ रोजी बारा वर्षे पूर्ण होत आहेत.२०१४ साली फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेंव्हा ते भाजपचे राज्यातील पहिलेच मुख्यमंत्री ठरले होते.
विशेष म्हणजे या बारा वर्षांच्या कार्यकाळात फडणवीस यांनी एकूण तीनवेळा मुख्यमंत्री पदाची, एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथा घेतली. आणि अडीच वर्षे विधानसभेत विरोधी पक्ष नेता म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली.
फडणवीस १९९९ मध्ये प्रथम आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाले. पुढे २००४, २००९ च्या निवडणुकीत त्यांनी आमदारकीची हॅटट्रीक केली. या काळात विरोधी बाकांवरील अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख झाली.
२०१४ साली मोदी लाटेत केंद्रात भाजप सत्तारूढ झाला. त्यानंतर, प्रदेशाध्यक्ष म्हणून फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र भाजपने विधानसभेत १२३ जागा जिंकत सत्तेचा सोपान गाठला आणि मुख्यमंत्री पदाची सुत्रेही फडणवीस यांच्याकडे आली. सलग पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करण्याची किमया त्यांनी साधली.
२०१९ मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्याने फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा दुसरा कार्यकाळ औटघटकेचा ठरला. मविआमुळे विधानसभेत सर्वात मोठा असलेला भाजप विरोधी पक्षात बसला आणि फडणवीस विरोधी पक्षनेते बनले.
मात्र, अडीच वर्षानंतर शिवसेनेतील फुटीमुळे फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री बनले. महायुतीचा नवा पटही मांडला गेला. २०२४ च्या निवडणुकीत मात्र महायुतीने प्रचंड बहुमत मिळविले आणि फडणवीस तिसर्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले.
३१ ऑक्टोबर २०१४ साली पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात तर फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या कालावधीबाबत शरद पवारांनाही मागे टाकले आहे. मुख्यमंत्रीपदावरील सर्वाधिक कालावधीबाबत फडणवीस यांच्या पुढे आता दिवंगत वसंतराव नाईक आणि दिवंगत विलासराव देशमुख या दोन मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ आहे.