भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड केली. BJP X Account
मुंबई

महाराष्‍ट्रातील जनतेला साष्‍टांग नमस्‍कार: देवेंद्र फडणवीस यांनी व्‍यक्‍त केली कृतज्ञता

Devendra Fadnavis | एकनाथ शिंदे, अजित पवारांचेही मानले आभार

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : यावर्षीची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऐतिहासिक अशी होती. 'एक है तो सेफ है', 'मोदी है तो मुमकीन है', यावर विश्वास दाखवत महाराष्ट्रातील जनतेने अभूतपूर्व जनादेश महायुतीला दिला. त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घालतो. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आण मित्र पक्षांचे आभार मानतो, अशा शब्दांत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.

फडणवीस म्हणाले की, भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात महायुतीचे सरकार स्थापन होत आहे. याचा विशेष आनंद आहे. देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची १०० वी जयंती याच वर्षी होत आहे. या महत्त्वाच्या वर्षात मोठी जबाबदारी आणि जनादेश महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला दिला आहे. लाडक्या बहिणी, लाडका भाऊ, शेतकरी, दलित आदींसह सर्व समाजातील घटकांनी विश्वास दाखविला. त्याबद्दल आभार मानतो.

२०१९ मध्ये जनादेश हिसकावून घेतला

आम्हाला अभिमान आहे की, 2019 नंतर एकही आमदार किंवा नेता आम्हाला सोडून गेला नाही. सर्वजण एकत्र राहिले आणि आम्ही 2022 मध्ये सरकार स्थापन केले. आज महायुतीलाही सत्ता मिळाली आहे. ऐतिहासिक जनादेश मोदीजी सलग तीन वेळा पंतप्रधान झाले आहेत आणि आता मी वॉर्ड स्तरावरचा कार्यकर्ता मुख्यमंत्री झालो आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा या दोघांनीही महाराष्ट्र भाजपला निवडणुकीत मोठा पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले. हा अभूतपूर्व असा जनादेश आम्हाला देण्यात आला. त्यामुळे आमची जबाबदारी आता अधिक वाढली आहे.

 बूथवर काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा संधी

पंतप्रधान मोदी यांनी बूथवर काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून संधी दिली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचेही आभार मानतो. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ताकद दिली. त्यांचेही आभार मानतो. शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानतो. महाराष्ट्र भाजप पूर्ण ताकदीने मैदानात होता. त्या सर्व टीमचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी २४ तास काम करेल. जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध असेल, अशा भावना फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT