मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी (दि. १५) पुण्याहून बेंगळुरूला विशेष विमानाऐवजी इंडिगोच्या नियमित प्रवासी विमानाने रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा व्यावहारिक उदाहरणाद्वारे संदेश दिला आहे.
काल (गुरुवार) विधानभवनापर्यंत आपला नियमित ताफा टाळून बाईकने प्रवास केल्यानंतर, आजही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सामान्य प्रवाशांसोबत विमान प्रवास करत सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन दिले. पुण्याहून ते आर्ट ऑफ लिविंगच्या एका कार्यक्रमासाठी बंगळुरूकडे इंडिगोच्या सार्वजनिक विमानातून रवाना झाले.
विशेष विमान किंवा सरकारी विमानाऐवजी व्यावसायिक विमान कंपनीच्या नियमित फ्लाइटचा वापर करून त्यांनी पर्यावरणस्नेही, अर्थव्यवस्थेला पूरक आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या वाहतुकीच्या सवयीला प्रोत्साहन दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच इंधन बचत करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ शब्दांत नव्हे तर कृतीतून प्रतिसाद दिला आहे.