मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्याचे केलेले आवाहन लक्षात घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई ते शिर्डीचा प्रवास वंदे भारत एक्स्प्रेसने केला. त्यांच्या या प्रवासाची राज्यभरात चर्चा आहे.
पर्यावरणपूरक आणि सोयीस्कर प्रवासाला प्राधान्य देण्याचा संदेश मुख्यमंत्र्यांनी या प्रवासातून दिला आहे. शिर्डीकडे रवाना होताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्याची गरज अधोरेखित केली. इंधनाचा वाढता वापर, पर्यावरणावरील परिणाम पाहता नागरिकांनी रेल्वे, बसचा अधिक वापर करावा, असे त्यांनी म्हटले.